एनएमएमटीच्या आयटीएमएस प्रणालीचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

परिवहन उपक्रमाला उत्कृष्ट नागरी संस्था पुरस्कार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 18 जानेवारी 2021:

भारतीय प्रशासकीय सेवेत अतुलनीय कामगिरी केलेले व्ही. रामचंद्रन यांच्या प्रित्यर्थ बंगळूर येथील जनाग्रह सेंटर फॉर सिटझनशीप ॲण्ड डेमोक्रसी या संस्थेमार्फत देण्यात येणा-या ‘जनाग्रह सिटी गव्हर्नन्स ॲवार्ड 2020 (Janaagraha City Governance Awards 2020)’ मधील ‘उत्कृष्ट नागरी संस्था पुरस्कार (Best Civic Agency Award – Second Runner up)’ या पुरस्काराने नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमास गौरविण्यात आले. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकासमंत्री हरदीप सिंग पुरी यांचे हस्ते प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार महापालिका  आयुक्त अभिजीत बांगर यांनी विशेष ऑनलाईन समारंभात स्विकारला. याप्रसंगी परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड उपस्थित होते.

नागरिकांचे जीवनमान आणि शहरांचा दर्जा उंचावणे हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून कार्यरत असणा-या जनाग्रह सेंटर फॉर सिटझनशीप ॲण्ड डेमोक्रसी या संस्थेच्या वतीने उत्कृष्ट राज्य, महानगरपालिका, नागरी संस्था, राज्य निवडणूक आयोग आणि राज्य वित्तीय आयोग अशा पाच गटांमध्ये राष्ट्रीय स्तरावर हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. नमुंमपा परिवहन उपक्रमाच्या वतीने वाहतूक व्यवस्थेचे ऑनलाईन नियोजन करणा-या Integrated Transport Management System (ITMS) करिता नामांकन सादर करण्यात आले होते.

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने माहिती आणि संवादाचे तंत्रज्ञान अत्याधुनिक प्रकल्प विकसित केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सीबीडी, बेलापूर येथील मुख्यालयात सुसज्ज मध्यवर्ती नियंत्रण कक्ष (Command & Control Center) स्थापन केला असून जीपीएस प्रणालीद्वारे उपक्रमाच्या 500 हून अधिक बसेस तसेच तुर्भे, आसुडगांव व घणसोली ही आगारे आणि 14 नियंत्रण कक्ष हे या मध्यवर्ती नियंत्रण कक्षास थेट जोडण्यात आलेले आहेत. या प्रणालीद्वारे दैनंदिनरित्या रत्यांवर धावणाऱ्या एनएमएमटी बसेस तसेच चालक, वाहक यांच्यावर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवले जाते. आयआयटीएमएस या प्रगत प्रणालीचा मुख्य उद्देश हा प्राप्त माहिती विश्लेषणाच्या आधारे वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन व नियोजन करणे हा असून याव्दारे प्रवाशीभिमुख, वक्तशीर व विश्वासार्ह सेवा प्रदान केली जात आहे.

या प्रकल्पांतर्गत प्रामुख्याने ‘मोबाईल ई-तिकीट’ व ‘बहुउद्देशीय नवी स्मार्ट कार्ड’ या सेवेचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे परिवहन उपक्रमाची सेवा अधिकाधिक प्रवाशी उपयोगी  करण्याच्या मुख्य उद्देशाने तसेच प्रवाशांना उपक्रमाच्या कार्यान्वित सर्व मार्गांवरील वातानुकूलित व सर्वसाधारण बसेसच्या अचूक वेळेची माहिती NMMT Bus Tracker या स्वतंत्र Mobile App द्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

यामधून उपक्रमाच्या बसेस जीपीएसद्वारे जोडून प्रत्येक बसच्या प्रत्यक्ष ठिकाणाची माहिती, बस येण्या-जाण्याच्या वेळा, मोबाईल ॲपमध्ये बस ट्रॅक करणे तसेच आपण कोणत्या बसमध्ये प्रवास करीत आहोत याचा संदेश ॲपद्वारे प्रवाशांच्या नातेवाईकांना देता येण्याची सुविधा आहे. सद्यस्थितीत लाखाहून अधिक प्रवाशी या मोबाईल ॲप सेवेचा वापर करीत आहेत.

——————————————————————————————————