नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचा निर्धार
- अविरत वाटचार न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, २ जानेवारी २०२१
कोव्हीड काळातील मागील वर्ष संपूर्ण जगासाठी अत्यंत क्लिष्ट व वेदनादायी होते. या संकट काळात स्वच्छ सर्वेक्षणामध्ये आपला देशात तृतीय क्रमांक आला ही एक सोनेरी किनार लाभली. देशातील कचरामुक्त शहरांचे फाईव्ह स्टार मानांकन मिळविणाऱ्या सहा शहरांमध्ये नवी मुंबई हे राज्यातील एकमेव शहर ठरले ही दिलासादायक बाब असल्याचे सांगत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या पुढील काळात देशात पहिल्या क्रमांकाचे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून आपण वाटचाल करीत असताना ‘निश्चय केला. नंबर पहिला’ हे केवळ घोषवाक्य नाही तर ते आपले ध्येय झाले पाहिजे असे सांगत आपला पहिला नंबर येईल असे मनातून वाटले पाहिजे, मग त्यादृष्टीने संपूर्ण क्षमतेने प्रयत्न होतील, आणि मग अशक्य काही नाही अशा शब्दात मनोगत व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या 29 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे अधिकारी, कर्मचारी यांच्याशी आयुक्तांनी थेट संवाद साधला.
स्वच्छ सर्वेक्षणाची प्रक्रीया ही वर्षभर सुरु असते. अगदी कोव्हीड काळातही स्वच्छ भारत मिशनव्दारे नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातच होत्या. त्यामुळे सर्वेक्षणाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष जागेवरील काम दोन ते तीन महिने चालल्याचे दिसत असले तरी स्वच्छतेची परीक्षण प्रक्रिया विविध माध्यमातून वर्षभर सुरु असते असे सांगितले. त्यामुळे नागरिकांच्या सहभागाने देशातील प्रथम क्रमांकाच्या ध्येयासाठी एकजुटीने प्रयत्न करुया असा निर्धार आयुक्तांनी व्यक्त केला.
यादृष्टीने ‘झ्रिरो गार्बेज ऑन रोड’ हे ध्येय निश्चित करुन अगदी छोटयातील छोट्या तक्रारीचेही 100% निवारण झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये म्हणून योग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच नियमांचे उल्लंघन करून जाणून बुजून अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर कारवाईदेखील केली पाहिजे असे ते म्हणाले. त्यासोबतच कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी नागरिक पातळीवर त्याची प्रक्रीया केली जावी व कमीत कमी कचरा महानगरपालिकेच्या प्रक्रियास्थळी नेण्याची गरज पडावी यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. स्वच्छता ही सवय असून आपण चॉकलेट खाल्यानंतर त्याचे रॅपर कुठेही टाकतो की खिशात ठेवून कचरा पेटीत टाकतो यावर आपली स्वच्छतेविषयीची आस्था दिसून येते असे सांगत ही आस्था वाढविण्याची आवश्यकता असल्याचे आयुक्तांनी गरज व्यक्त केली.
वर्धापनदिनाच्या निमित्ताने अधिकारी-कर्मचारी यांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे व महानगरपालिकेच्या नोकरीत आपले उत्तरदायित्व लोकांप्रती आहे या कर्तव्याची जाणीव ठेवून वर्तणूकीत व कामाच्या पध्दतीत बदल करण्याचा संकल्प करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पु.ल.देशपांडे व व.पु.काळे यांच्या साहित्यातील उदाहरणे देत महानगरपालिकेमध्ये कामे वेळेत होत नाहीत हे 1960 च्या दशकातील लोकांच्या मनातील चित्र बदलणारे काम करण्याचा आपण आगामी नववर्षाचा संकल्प करुया असे आवाहन आयुक्तांनी केले.
कोव्हीड काळात ‘मिशन ब्रेक द चेन’ हाती घेऊन आवश्य्क त्या सुविधा निर्माण् करण्यावर भर देण्यात आला. आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर दोनच दिवसांत जलद अहवाल मिळणाऱ्या अँटीजेन टेस्टींग सुरु करण्यात आल्या. 11 दिवसांत महानगरपालिकेची स्वत:ची अत्यंत अदययावत सर्वोत्कृष्ट सुविधा असलेली आरटी-पीसीआर लॅब सुरु करण्यात आली. नुकतेच या लॅबने एक लाख टेस्टींग पूर्ण केल्या असून यामुळे महानगरपालिकेची स्वत:ची मौल्यवान आरोग्य सुविधा तयार झाली आहे. तसेच आठ ते दहा कोटी रकमेची बचत झालेली असल्याचे त्यांनी सांगितले.
कोव्हीडच्या संकटाचा सामना करताना महानगरपालिकेने प्रचंड प्रयत्न केले. वेळ काळाचे भान न ठेवता कोरोना प्रतिबंधाचे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून ही लढाई लढली. यामध्ये नागरिकांचीही चांगली साथ लाभली याचा विशेष उल्लेख त्यांनी केला. या कालावधीत महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी – कर्मचारी यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अथक मेहनत केली असे सांगताना महिला डॉक्टर्स व महिला कर्मचारी यांच्या कामाचा आयुक्तांनी विशेष उल्लेख केला. दररोज करण्यात येत असलेल्या डेथ ऑडिट या दैनंदिन मृत्यू विश्लेषणामुळे मृत्यू दर रोखण्यास मदत झाली असे त्यांनी आवर्जून सांगितले. आवश्यकतेनुसार कोव्हीड केंद्रे व त्यातील सुविधा वाढविण्यात आल्या. रुग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजन सुविधा पुरविण्यात आली. तसेच कोव्हीड केंद्राच्या शौचालयामध्येही ऑक्सिजन व्यवस्था करण्यात आली अशा विविध बाबी त्यांनी व्यक्त केल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यानंतर वाशी येथील सार्वजनिक रूग्णालय नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी पूर्ववत नॉन कोव्हीड करण्यात आले तसेच नेरूळ व ऐरोली रूग्णालयात मेडिकल व आयसीयू वॉर्ड सुरू करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
ऑक्टोबरपासून रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिसून येत असले तरी धोका अजून टळलेला नाही. युरोपमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नविन स्ट्रेनचा रुग्ण सुदैवाने नवी मुंबईत आढळलेला नसला तरी सावध राहणे गरजेचे आहे. याकरीता मास्कचा नियमीत वापर, सुरक्षित अंतर तसेच सतत हात धुणे अथवा सॅनिटायझर वापरणे ही सुरक्षेची त्रिसुत्री रोजच्या जीवनात अंगीकारणे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. कोव्हीडची लस नागरिकांपर्यंत पोहोचायला वेळ लागेल त्यामुळे दक्ष राहून काळजी घ्यावी. नवे वर्ष सुरु झाले म्हणजे फक्त कॅलेंडर बदलले, विषाणू तोच आहे. त्यामुळे स्वत:चे व कुटुंबाचे कोरोनापासून रक्षण करण्यासाठी सुरक्षा नियमांचे पालन करा असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
याप्रसंगी प्रत्यक्ष स्वच्छता कार्यात दैनंदिन योगदान देणाऱ्या पुरुष व महिला स्वच्छता दूतांचा आयुक्तांच्या शुभहस्ते कृतज्ञता सन्मान करण्यात आला. आरंभ क्रिएशनच्या कलावंतांनी सादर केलेल्या स्वच्छताविषयक प्रबोधनपर लोकसंगीतमय पथनाटयाला कौतुकाची दाद मिळाली.
- यावेळी वसुंधरा अभियानात सहभागी होण्याची सामुहिक शपथ अधिकारी, कर्मचारी यांनी आयुक्तांसमवेत ग्रहण केली.
======================================================
मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप