सीवूडमधील कोरोना योद्धयांना नव्या कोऱ्या स्कूटींचे गिफ्ट

भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांच्या भेटवस्तूने युवक भारावले

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, ८ नोव्हेंबर २०२०

कोरोना संकटात जिवावर उदार होवून जीवनावश्यक वस्तू जनसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी दिवसरात्र करणाऱ्या सीवूड मधील दोन कोरोना योध्यांचा नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी दोन स्कूटी भेट देवून त्यांच्या कामाचा गौरव केला आहे. अज्जू उर्फ वीरजित कदम आणि रोहन पवार अशी या कोरोना योद्ध्यांची नावे आहेत. माजी नगरसेवक भरत जाधव यांच्याकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर मिळालेल्या या अनोख्या भेटवस्तूमुळे दोन्ही तरुणांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात व जगात लॉकडाऊन असताना,अशा भयावह परिस्थितीमध्ये कोणीही घराच्या बाहेर पडत नव्हते. अशावेळी नागरिकांना भाज्या,दूध,अंडी, डाळ, तांदूळ अशा जीवनावश्यक वस्तू मिळणे अवघड झाले होते. नागरिकांची अडचण लक्षात घेवून भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत जाधव यांनी पुढाकार घेत राज्याच्या विविध भागांत जावून तेथील शेतकऱ्यांकडून थेट भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तू ना नफा ना तोटा तत्वावर नवी मुंबईत आणल्या. या भाज्या तसेच इतर जीवनावश्यक सामान नागरिकांना त्यांच्या सोसायटीपर्यंत पोहोचवायचे कसे, असा प्रश्न भरत जाधव यांना पडला होता. अशावेळी वीरजित कदम आणि रोहन पवार यांनी सोसायटीपर्यंत थेट कृषीमाल नागरिकांना पोहोचविण्याची जबाबदारी उचलली. कोरोनाचे संकट असताना घराबाहेर पडून लोकांना अत्यावश्यक सेवा पुरविण्याचे मोठे काम या तरुणांनी खांद्यावर घेतले आणि कोरोनाचा सर्वाधिक प्रादूर्भाव असलेल्या कालात लोकांना जीवनावश्यक वस्तू घरापर्यंत पोहोचविण्याचे काम केले.

बळीराजाच्या ( फळे भाजी धान्य कांदा बटाटा इत्यादी ) शेतमालाला थेट बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्याला थेट ग्राहकांकडून आपल्या मालाचे पैसे मिळाले तसेच सीवूड्सकरांना चांगल्या दर्जाचा शेतमाल अर्ध्या किमतीत उपलब्ध झाल्यामुळे कोरोनाच्या संकटात नागरिकांनाही आर्थिक दिलासा मिळाला. या सर्व जीवनावश्यक वस्तू गेटपोच करण्याचे काम या दोन तरुणांनी अविरत केले. त्या दोन तरुणांचा  दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दोन दुचाकी वाहने देऊन सत्कार करण्यात आल्याची माहिती माजी नगरसेवक भरत जाधव यांनी दिली.

आपल्या परिसरातील सामाजिक काम करणाऱ्या तरुणांचा उत्साह वाढविणे आपले काम  आहे. त्यामुळेच या दोन तरुणांना स्कूटी देण्याचा विचार केल्याचेही  भरत जाधव यांनी सांगितले. जाधव यांच्या या कृतीचे नागरिकांनीही कौतूक केले आहे.

=====================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा