‘माझी वसुंधरा’ अभियानाची सुरुवात शासकीय कार्यालयांमधून व्हावी

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं आवाहन

पुणे आणि कोकण विभागातील नियोजनाचा आढावा

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मुंबई, 3 नोव्हेंबर 2020:

पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने राज्यात नुकतेच ‘माझी वसुंधरा’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधी, विविध विभाग, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते यांच्यासह लोकसहभागातून हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे, असे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

अभियानाच्या पुणे आणि कोकण विभागातील नियोजनाची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दोन्ही विभागातील आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करुन घेतली.

पर्यावरण मंत्री ठाकरे यांच्यासह पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे हे मंत्रालयातून सहभागी झाले होते.  पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्यासह दोन्ही विभागातील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी वरिष्ठ अधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.

अनियमीत पाऊस, निसर्गसारखी वादळे ही संकटे हवामानातील बदलामुळे निर्माण झालेली आहेत. अशी संकटे निर्माण होऊ नयेत यासाठी पर्यावरण रक्षणाशिवाय दुसरा उपाय नाही. त्यामुळे येत्या काळात ‘माझी वसुंधरा’ अभियानातील सर्व घटकांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. याची सुरुवात शासकीय कार्यालयांमधून करण्यात यावी. शासकीय कार्यालयांमधील उर्जा वापराचे, पाणी वापराचे लेखापरिक्षण, कचऱ्याचे व्यवस्थापन, साधनसामुग्रीचे व्यवस्थापन, अडगळीतील सामानाचे व्यवस्थापन, कार्यालय परिसरातील वृक्षाच्छादन आदी बाबींवर काम करण्यात यावे. तसेच सर्वांनी आपल्या प्राधान्यक्रमात या अभियानाचा समावेश करावा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.