नवी मुंबई पोलिसांची धडक कारवाई
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 7 ऑक्टोबर 2020
नवी मुंबईतल्या तुर्भे स्टोअर येथे राहणा-या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून पळ काढणा-या एका इसमाला नवी मुंबई पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत उस्मानाबाद येथून अटक केली आहे.
तुर्भे स्टोअर येथे राहणा-या विजय राठोड याने परिसरातच राहणा-या एका 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला 4 ऑक्टोबर रोजी घरासमोरील गल्लीमध्ये अडवून जबरदस्तीने घरात नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत मुलीने दिलेल्या तक्रारीवरून तुर्भे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपआयुक्त सुरेश मेंगडे आणि सहा. पोलीस आयुक्त भरत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन राणे यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके स्थापन केली. दरम्यान गुन्हा दाखल होणार याची कल्पना आल्याने राठोड नवी मुबंईतून पळून गेला. त्याने मोबाईलही बंद केला. तो एका खाजगी ट्रॅव्हल्सने पुण्याच्या दिशेने पळून गेल्याची माहिती पोलिसांना समजली. रात्री उशीरा सुकापूर टोल नाका तसेच पुणे शहर नियंत्रण कक्ष येथे आरोपीची माहिती आणि फोटो देवून शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही. राठोड याने आपला फोन बंद ठेवल्याने तांत्रिक तपासातही मर्यादा निर्माण झाल्या. मात्र पोलिसांनी त्याचे जवळचे मित्र, कुटुंबिय यांच्या फोन क्रमांकावर पाळत ठेवायला सुरूवात केली. त्याचवेळी त्याच्या पत्नीच्या मोबाइलवर आलेले फोन नंबर तपासताना त्या फोन नंबरपैकी एक संशयित नंबर आढळून आला. या क्रमांकाचा माग काढला असता तो तालुका उमरगा उस्मानाबाद इथला असल्याचे आणि आरोपीनेच तो केला असल्याचे आढळून आले. तुर्भे पोलीस ठाण्यातील हवालदार दिनेश मोरे, रवी पवार, पोलिस शिपाई विकास शिंगाडे यांचे पथक उस्मानाबादला पाठविण्यात आले. तोपर्यंत राठोड याने लोहारा तालुक्यातील होळी गावात आसरा घेतला. स्थानिक पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्याचा शोध घेतला असता तो गावाबाहेर असलेल्या एका उसाच्या शेतात लपून बसल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली.
- कारवाईत सहभागी असलेले पथक
या कारवाईत तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन राणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक डोंब, सपोनि पवन नांद्रे, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अर्चना गाढवे, पोलीस हवालदार छत्रुग्न मावळे, दिनेश मोरे, सुमित सरगर, अझहर मिर्जा, रवी पवार, सचिन पाटील, विकास शिंगाडे, दत्तात्रय एडके, सुनिल सकट, अमोल भोसले यांनी सहभाग घेतला.
======================================================
- इतर बातम्यांचाही मागोवा