नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्याहस्ते २५ लाखांचा धनादेश वारसांना सुपूर्द
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, ५ सप्टेंबर २०२०
कोरोनाविरोधातील लढाईत आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या दिवंगत वाहन चालक संभाजी भास्कर यशवंतराव यांच्या पत्नी जयश्री संभाजी यशवंतराव यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या “कामगार कल्याण निधी”मधून “विशेष सानुग्रह अनुदान” म्हणून 25 लाख रुपयांचा धनादेश अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आला. याशिवाय इतरही दोन कर्मचाऱ्यांच्या वारसांना विशेष सानुग्रह अनुदान रक्कम प्रदान करण्यात येत आहे. यावेळी उपायुक्त चाबुकस्वार आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
कोरोना विरोधातील लढाईमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना कोरोना बाधितांचा शोध, तपासणी, उपचार कार्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासह इतरही विभांगातील अधिकारी, कर्मचारी अथक काम करीत आहेत. या अधिकारी, कर्मचारी यांना काम करताना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याकडे आयुक्त अभिजीत बांगर यांचे कटाक्षाने लक्ष असून कोरोना बाधित होणा-या अधिकारी, कर्मचारी यांचा उपचार कालावधी व बरे होऊन वैद्यकीय सल्ल्याने कामावर रूजू होण्याचा कालावधी कर्तव्य कालावधी समजण्याबाबतचे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे.
- नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य सेवेतील जे अधिकारी, कर्मचारी कोव्हीड 19 शी संबंधित काम करीत असताना दुर्दैवीरित्या मृत्यूमुखी पडतात त्यांच्या वारसांना केंद्र सरकारच्या ‘प्रधान मंत्री गरीब कल्याण पॅकेज : इन्शुरन्स स्कीम फॉर हेल्थ वर्कर्स फाईटींग कोव्हीड-19’ या योजनेअंतर्गत 50 लाख रुपयांचे ‘सुरक्षा विमा कवच’ तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या “कामगार कल्याण निधी”मधून “विशेष सानुग्रह अनुदान” म्हणून 25 लाख रुपये अशी एकूण 75 लाख रुपयांची रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
आरोग्य सेवेव्यतिरिक्त महानगरपालिका आस्थापनेवरील कोरोना विषयक सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार व मदतकार्य या कार्यवाहीच्या कर्तव्यावर असणा-या अधिकारी, कर्मचारी यांचा कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊन दुर्देवी मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना महानगरपालिकेच्या “कामगार कल्याण निधी”तून रुपये 50 लाख रुपये रक्कमेचे “विशेष सानुग्रह अनुदान” देण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.
अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विमा कवच योजना समितीच्या 25 ऑगस्ट 2020 रोजी झालेल्या बैठकीमध्ये 2 दिवंगत वाहनचालक कर्मचारी यांच्या वारसांना केंद्र सरकारच्या ‘प्रधान मंत्री गरीब कल्याण पॅकेज : इन्शुरन्स स्कीम फॉर हेल्थ वर्कर्स फाईटींग कोव्हीड-19’ योजने अंतर्गत 50 लाख रुपये रकमेचे ‘सुरक्षा विमा कवच’ बँकेव्दारे मिळणेबाबतची पुढील कार्यवाही करणे व त्यांचे वारस तपासून महानगरपालिकेच्या कामगार कल्याण निधीमधून प्रत्येकी 25 लक्ष रक्कमेचे विशेष सानुग्रह अनुदान देणेस मंजूरी देण्यात आली. तसेच दिवंगत कनिष्ठ अभियंता यांच्या वारसास महानगरपालिकेच्या “कामगार कल्याण निधी”तून रुपये 50 लाख रुपये “विशेष सानुग्रह अनुदान” देण्याचे मंजूर करण्यात आले आहे.
===================================================
- इतर बातम्यांचाही मागोवा