- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- कल्याण,11जुलै 2020
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यासह कल्याण – डोंबिवली महापालिका परिक्षेत्रात कोविड१९ रुग्णांची वाढणारी संख्या आटोक्यात आणण्यासाठी धारावीच्या धर्तीवर ‘चेस द व्हायरस’ मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. राज्याचे पर्यटन तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी कल्याण पश्चिम येथील वाधवा स्पोर्ट्स क्लब येथे कल्याण डोंबिवली महापालिका परिक्षेत्रातील करोनाच्या साथीसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.
धारावीसारख्या गच्च वस्तीतही करोनाची साथ आटोक्यात आणणे शक्य झाले असून कल्याण-डोंबिवली परिक्षेत्रातही ही बाब अशक्य नाही. त्यासाठी ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम अधिक तीव्र करण्याची सूचना ठाकरे यांनी केली. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वर अधिक भर द्या, टेस्टसची संख्या वाढवा; आकडे वाढलेले दिसले तरी घाबरून जाऊ नका, अशा सूचनाही ठाकरे यांनी केल्या.
मुंबई आणि ठाण्याच्या धर्तीवर कल्याण – डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर आदी ठिकाणीही जम्बो आरोग्य व्यवस्था उभारण्यात येत आहेत. एकही नागरिक उपचारांपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासनाने दक्ष असले पाहिजे. मृत्यू दर कमी ठेवणे, याला प्राधान्य आहे, असे ठाकरे आणि पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले. या प्रसंगी मुंबई महापालिकेतील अधिकारी किरण दिघावकर यांनी धारावी पॅटर्न संदर्भात तपशीलवार माहिती देऊन काही उपयुक्त सूचना केल्या.
या बैठकीला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनिता राणे, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, भिवंडी महापालिका आयुक्त पंकज अशिया, उल्हासनगर महापालिका आयुक्त राजा दयानिधी व अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.प्रशांत रसाळ आदी वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
============================
- इतर बातम्यांचाही मागोवा