अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, 15 जून 2020:
डिफेन्स इन्स्टिट्युट ऑफ अडवान्स टेक्नॉलॉजी या संस्थेने आयुर्वेदिक उत्पादनांच्या नॅनोफायबरवर आधारित जैवअपघटनीय (बायोडिग्रेबल) फेस मास्क विकसित केला आहे; जो विषाणूला निष्क्रियकारी आणि जीवाणू प्रतिरोधक म्हणून कार्य करेल. संस्थेने या फेस मास्कचे नाव ‘पवित्रपाती’ असे ठेवले आहे.
हा मास्क ज्या कपड्यापासून तयार करण्यात आला आहे, त्या कपड्यामध्ये जीवाणू-प्रतिरोधक आणि विषाणू प्रतिरोधक गुणधर्म असणाऱ्या कडुनिंबाचे तेल, हळद, कृष्ण तुळस, ओवा, काळी मिरी, हिरड अरबी, लवंग, चंदन, केशर यासारख्या वनौषधींच्या अर्काचा वापर केला आहे.
आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ‘पवित्रपाती’चा वापर स्वयं-दक्षतेसाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारा घटक म्हणून कार्य करेल. हे उत्पादन जीवाणूरोधी, बुरशीरोधी, विषाणूरोधी, सच्छिद्र, उत्कृष्ट जलरोधक (बाहेरचा स्तर), जलस्नेही/पाणी शोषून घेणारे (आतील स्तर) आणि जैवअपघटनीय (बायोडिग्रेबल) आहे. या तंत्रज्ञानाने हे सिद्ध केले आहे की विणलेल्या कपड्यांमधील न विणलेला पडदा थेंब, पाण्याचा हपका, फवारा, जीवाणू आणि विषाणूंना प्रतिरोध करण्यास पाठबळ देते. हे उत्पादन हवेच्या माध्यमातून पसरणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी मास्क म्हणून नियमितपणे वापरले जाऊ शकेल.
एएसटीएम डी-737 च्या मानकानुसार हा मास्क वापरणा-याला श्वास घेण्यासाठी आरामदायक, नॅनोफायबर पटल सरंध्रता (मॅट पोर्सिटी), जैवविघटन (बायोडिग्रेबल) आणि एएसटीएम मानकांनुसार यांत्रिक गुणधर्मांनुसार उत्पादनाची श्वास क्षमता चाचणी केली आहे .
या तीन स्तरीय मास्क मधील वनौषधींचा अर्क विषाणूंच्या संपर्कात आल्याने विषाणू निष्प्रभावकारी होऊन हा मास्क विषाणूरोधी क्षमता प्रदान करतो. वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई) म्हणून संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण उपायांसाठी आणि कचरा व्यवस्थापन सामग्रीसाठी याचे उत्पादन वाढविले जाईल. यात कपडे, हातमोजे, गाऊन, चेहरा संरक्षक, हेड कव्हर इत्यादींचा समावेश असेल. या उत्पादनाची घडी घालता येईल (फोल्डेबल). एनएमआर द्वारे प्रथिन रेणूंची विप्रकृतीकरण क्षमता समजून घेण्यासाठी बनावट नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आणि या चाचणीच्या परिणामांनी हे सिद्ध केले की वनौषधींच्या अर्कामुळे अमिनो आम्लाचे विप्रकृतीकरण झाले. डीआयएटीने संभाव्य उत्पादकांना हे तंत्रज्ञान विनामूल्य देण्याचे ठरविले आहे.
—————————————————————————————————-