३१ मेपर्यंत ‘ही’ कामे पूर्ण करा- नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ

पावसाळापूर्व कामांचा आढावा घेताना अधिकाऱ्यांना सूचना 

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, २८ मे २०२०

मोसमी पाऊस सुरु होण्यास आता काही दिवस राहीले आहेत. यापार्श्वभूमीवर घ्यावयाची खबरदारी व त्या अनुषंगाने कराव्या लागणाऱ्या पूर्वतयारीबाबत नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी आज बैठक घेवून प्रत्येक विभागाने पावसाळापूर्व कामांबाबत कार्यपूर्तता प्रमाणपत्र 1 जूनपर्यंत द्यावे  असे सर्व विभागांना निर्देशित केले. पावसाळापूर्व कामांच्या नियोजनाबाबत आयुक्तांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सींगव्दारे विशेष बैठक घेतली व संबंधित विभागांमार्फत सुरु असलेल्या कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.

महापालिका मुख्यालयातील विशेष समिती सभागृहात आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व  अतिरिक्त आयुक्त संजय काकडे आणि इतर विभागप्रमुख सोशल डिस्टन्सींगचे पालन करून उपस्थित होते.

महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी खालीलप्रमाणे कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहे

  • पावसाळापूर्व गटारे सफाई 31 मे पर्यंत व नालेसफाई एका आठवड्यात तातडीने पूर्ण करावी व त्यामधून निघणारा गाळ लगेच दुस-या दिवशी उचलण्यात यावा
  • होल्डींग पाँड्स हे शहराची कवच कुंडले असून त्यावरील फ्लॅप गेट दुरुस्त करण्याचे अंतिम टप्प्यात असलेले काम तातडीने पूर्ण करावे.
  • मोठा पाऊस आणि भरतीची वेळ एकच झाल्यास नवी मुंबई शहर हे समुद्र सपाटीपेक्षा कमी पातळीवर वसलेले असल्याने शहरातील काही भागात पाणी साचते, ही संभाव्य ठिकाणे लक्षात घेऊन तेथे पाणी उपसा पंपांची सख्या वाढविणे .
  • भूस्खलनाच्या संभाव्य जागा लक्षात घेऊन त्याठिकाणाहून काही प्रमाणात झोपड्या असल्यास त्या हलवाव्यात.
  • महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींचे विभाग कार्यालयांच्या माध्यमातून तातडीने सर्वेक्षण करून त्याची सूची प्रसिध्द करावी व तसे फलक त्याठिकाणी लावावेत
  • सध्या सुरु असलेली स्थापत्य विषयक कामे तातडीने करून घ्यावीत
  • उद्यान विभागामार्फत झाडांची छाटणी करताना व्यवस्थित आकार दिसेल अशाप्रकारे विहित वेळेत करावी.
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी कालावधीत उद्भवणारे साथीचे आजार लक्षात घेऊन आरोग्य विभागाने
  • सर्वोतोपरी खबरदारी घ्यावी व अनुषंगीक कार्यवाही करावी
  • पावसाळ्यामध्ये पाणी पुरवठा, विद्युत व्यवस्था सुरळीत राहील याकडे विशेष लक्ष द्यावे .
  • पावसाळ्यात कुठेही वाहतुक कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्यासोबत सिग्नल यंत्रणा सुरळीत राहिल याविषयी दक्षता घ्यावी.

  • एम.एस.ई.डी.सी. यांच्याशी समन्वय साधून ज्याठिकाणी ट्रान्सफॉर्मरला झाकणे नाहीत तसेच केबल उघड्या आहेत त्या त्वरीत दुरुस्त करून घेणेबाबत व संभाव्य अपघात टाळण्याबाबत एम.एस.ई.डी.सी. ला सूचित करावे. पावसाळापूर्व कामांच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इतर एम.आय.डी.सी., सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग, एम.एम.आर.डी.ए., रेल्वे, एम.टी.एन.एल., एम.एस.ई.डी.सी., प्राधिकरणांना या पूर्वीच्या शहर आपत्ती व्यवस्थापन समिती बैठकीत सूचना देण्यात आल्या होत्या त्याची अंमलबजावणी होत असल्याबाबत संबंधीत महापालिका विभागांनी पाहणी करावी व पाठपुरावा करावा असेही निर्देश आयुक्तांनी दिले. सर्व प्राधिकरणांनी समन्वय राखून कार्यकृती करावी अशा सूचना महापालिका आयुक्त  अण्णासाहेब मिसाळ यांनी यावेळी दिल्या.
कोरोनाशी लढताना त्यासोबतच आगामी पावसाळी कालावधी लक्षात घेऊन नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेत पावसाळापूर्व कामांकडे काटेकोर लक्ष देणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करीत महापालिका आयुक्त तथा शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब मिसाळ यांनी महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी आपली पावसाळा पूर्व कामे तातडीने पूर्ण करावीत व १ जून पर्यंत केलेल्या कामाचा कार्यपूर्तता अहवाल आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे द्यावा.

======================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा