कोरोना अपडेट्सः एपीएमसीतील कामगार, व्यापाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी विशेष कक्ष

नवी मुंबई महापालिकेचा उपक्रम

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवीमुंबई, 18 एप्रिल 2020

‘कोव्हीड 19’ चा प्रसार रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात असून ए.पी.एम.सी.मार्केटमधील व्यापारी, कामगार, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक, ट्रक चालक व क्लिनर्स यांच्या वैद्यकीय तपासणीकरिता तातडीने कोरोना नियंत्रक वैदयकीय तपासणी कक्ष सुरु करण्यात आला आहे.

अविरत वाटचाल : पेज लाइक करा. शेअर करा.
https://bit.ly/34IyLB9

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार, महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी ए.पी.एम.सी. प्रशासनाशी चर्चा करीत 5 मार्केटमध्ये कोरोना नियंत्रक वैद्यकीय तपासणी कक्ष स्थापन केले आहेत व फळ मार्केट, भाजीपाला मार्केट, दाणा मार्केट या तीन ठिकाणी तपासणी कामही सुरु केले. या तिन्ही ठिकाणी पहिल्या दिवशी 500 हून अधिक जणांनी वैद्यकीय तपासणी करून घेतली असून याठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन केले जात आहे.

प्रत्येक कक्षात डॉक्टर आणि फार्मासिस्ट यांची नेमणूक करण्यात आली असून ते कक्षात येणा-या प्रत्येक नागरिकाचे थर्मल स्कॅनीग करीत आहेत तसेच त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती घेऊन त्यांना ताप, घशात खव-खव / खोकला, सर्दी, श्वसनास त्रास अशाप्रकारची लक्षणे आहेत काय याची विचारपूस करून त्यादृष्टीने तपासणी करीत आहेत व आजाराची तीव्रता बघून औषधोपचार सूचवित आहेत. या तपासणीमध्ये कोरोना सदृष्य लक्षणे आढळल्यास स्वॅब कलेक्शन मोबाईल व्हॅनव्दारे थुंकीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत.

नवी मुंबईतील ए.पी.एम.सी. मार्केट ही आशियातील अत्यंत मोठी कृषी उत्पन्न बाजारपेठ असून त्याठिकाणी वाहनांची व माणसांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना घेत नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत याठिकाणी कोरोना नियंत्रक विशेष वैद्यकीय तपासणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

भाजीपाला मार्केट येथील आवक-जावक सकाळी लवकर असल्याने येथील तपासणी कक्ष सकाळी 7 ते 11 यावेळेत कार्यरत असेल तसेच फळ मार्केट व दाणा मार्केट मधील तपासणी कक्ष सकाळी 10 ते सायं. 5 या वेळेत कार्यरत असणार आहे. मसाला मार्केट आणि कांदा-बटाटा मार्केट मधील कक्षही सुरू करण्यात येत आहेत. तरी ए.पी.एम.सी. मार्केट संबंधित सर्व घटकांनी या तपासणी कक्षाला भेट देऊन आपली आरोग्य विषयक तपासणी करून घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.

========================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा