- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, २६ मार्च २०२०
नवी मुंबई महापालिकेच्या वाशी इथल्या प्रथम संदर्भ रूग्णालयात काल सकाळी मुंबईतील एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईची रहिवासी असलेल्या या महिलेचे कोरोना विषाणू चाचणीचे अहवाल सकारात्मक आले आहेत. मृत्यू होण्यापूर्वी चारच तासांपूर्वी तिला महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मुंबईतल्या गोवंडी इथं राहणारी ही महिला सुरुवातीला मुंबईतल्या एका खाजगी रूग्णालयात उपचार घेत होती. तिथून तिला नेरूळ इथल्या डी. वाय. पाटील रूग्णालयात हलविण्यात आलं होतं. डी. वाय. पाटील रूग्णालयातून २४ मार्च रोजी सकाळी या महिलेला पालिकेच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी नवीमुंबईत सार्वजनिक ठिकाणांचे निर्जंतुकीकरण
https://bit.ly/2WHE4ia
पालिकेच्या रूग्णालयात दाखल केल्यानंतर चार तासांत या महिलेचा मृत्यू झाला. त्यापूर्वी संशयित म्हणून महिलेची कोरोना विषाणू चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीचे रिपोर्ट आज पालिकेला मिळाले त्यात ती महिला कोरोना विषाणू पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. या महिलेशी संपर्कात आलेल्या रूग्णालयातील सर्व डॉक्टर, नर्स यांची चाचणी करण्यात आल्याची माहिती महापालिका वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब सोनवणे यांनी दिली.
होम क्वारंटाइन असूनही घराबाहेर फिरणाऱ्या दोघांविरोधात नवी मुंबईत गुन्हे दाखल
https://bit.ly/39hFLoZ
दरम्यान, नवी मुंबईत कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा सातपर्यंत पोहोचला आहे. वाशी विभागात आज दोघांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. काही दिवसांपूर्वी फिलिपाईन्स इथून वाशी इथल्या मशिदित आलेली एक व्यक्ति कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. या व्यक्तिच्या संपर्कात आलेल्या मौलवीचीही कोरोना विषाणू चाचणी काल पॉझिटिव्ह आढळून आली. याच मशिदीतील ३३ वर्षिय मॅनेजर आणि त्याचा २८ वर्षिय मुलगा या दोघांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या दोघांनाही मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून घरातच रहावे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.
=======================================================
- इतर बातम्यांचाही मागोवा
- पहिली ते आठवींपर्यन्त परीक्षा रद्द
https://bit.ly/2U5Jnq1