१० पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमल्यास कारवाई

ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचा निर्णय

कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी सर्व दुकाने, हॉटेल्स, आस्थापना पुढील ३१ मार्चपर्यंत बंद

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, २१ मार्च २०२०

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबधात्मक उपयायोजना म्हणून ठाणे शहरातील सर्व दुकाने, हॉटेल्स, आस्थापना, शेअर प्रवासी वाहतूक बंद ठेवण्या सोबतच शहरातील गर्दी टाळण्यासाठी रस्त्यावर, चौकांमध्ये कोणत्याही निमित्ताने १० पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत.

दरम्यान उद्या, २२ मार्च  रोजी देशात जनता कर्फ्यु जाहीर झाल्याने परिवहन सेवेची बससेवा ४० टक्केच सुरू ठेवण्याच्या सूचनाही सिंघल यांनी दिल्या आहेत. तथापि नागरिकांनी जनता कर्फ्यूला समर्थन म्हणून नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये असे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे.

  • ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी शहरातील अत्यावश्यक किराणा सामान, दुध व भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तु व औषधालय वगळून अन्य सर्व दुकाने ,आस्थापना   तसेच हॉटेल्स, बिअरबार, वाईन शॉप ३१ मार्चपर्यंत पुढील आदेश होई पर्यंत बंद ठेवण्यात यावीत असे आदेश आयुक्त सिंघल यांनी दिले आहेत.
  • सर्व खाजगी कंपनी, खाजगी आस्थापना ,सल्ला देणाऱ्या  संस्था, माहिती व तंत्रज्ञानक्षेत्रातील आस्थापना,सर्व उद्योग, व्यवसाय,व्यापार आदी दिनांक 31 मार्च पर्यत बंद ठेवण्यात येणार असून त्यांनी घरातूनच काम करावयाचे आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा, लागणारी उत्पादने निर्माण करणाऱ्या कंपन्या, आस्थापना यांना वगळण्यात आले आहे. 
  • कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था/ संघटना यांच्यावर महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम, २०२० चे नियम ११ नुसार, भारतीय दंड संहिता ( ४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतुदींनुसार दंडनिय/ कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.ठाणे महापालिकेचे सर्व उपआयुक्त, परिमंडळे, संबंधित सहाय्यक आयुक्त यांच्यावतीने पोलीस निरीक्षक यांच्या समन्वयाने सदरची कारवाई करण्यात येणार आहे.

नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्याच्यादृष्टीने महापालिका भवनात पदाधिकारी , अधिकारी यांना भेटायला येणाऱ्या अभ्यागतांना प्रतिबंध केले असून संबंधित अभ्यागतांना भेटणे जरुरीचे आहे की याची खातरजमा करून मुख्यालय व प्रभागसमितीमध्ये दैनंदिन फक्त ५ अभ्यागतांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.

=======================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा