कोरोनाचा हॉटेल उद्योगाला मोठा फटका

७० ते ८० टक्के नुकसान झाल्याची व्यावसायिकांची माहिती
  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, ३१ मार्च २०२०

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डान्सबार, पब  आदी बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.  नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून हॉटेल व्यवसाय सुरू ठेवण्यात आला आहे. मात्र नागरिकांनी हॉटेलमध्ये जाण्यास तसेच पार्सल मागविणे थांबविल्यामुळे हॉटेल व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.

  • कामाधंद्यानिमित्त नवी मुंबईत येणारे तसेच विद्यार्थी यांच्यासाठी पोटभरणीसाठी हॉटेलचा मोठा आधार आहे. मात्र कोरोना विषाणूचा संसंर्ग होवू नये म्हणून नागरिकांनी  सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे कमी केले आहे. तसेच बाहेर खाण्याचेही टाळू लागल्यामुळे हॉटेल व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.  आठवड्याभरातच हॉटेल उद्योगाला ७० ते ८० टक्के फटका बसल्याची माहिती नवी मुंबई हॉटेल असोसिएशनचे सचिव महेश शेट्टी यांनी अविरत वाटचालशी बोलताना दिली.

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने नुकतीच नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची भेट घेतली. तसेच स्वच्छतेबाबत आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती आयुक्तांना देण्यात आल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.

हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांसाठी सॅनिटायझर उपलब्ध करून घ्यावेत तसंच ग्राहक निघून गेल्यानंतर त्या जागेचे व्यवस्थित सॅनिटेशन करणे हॉटेल चालकांना बंधनकारक असल्याचे नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले. 

=====================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा