शासनाने सर्वसामान्यांना चालू महिन्याचे वीज व पाणीबिल भरण्यास एक महिना मुदतवाढ द्यावी

 भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, २१ मार्च २०२०

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत, त्या सर्व अभिनंदनीय आहेत. मात्र, महिना अखेरचा काळ असल्याने एप्रिलच्या सुरुवातीला सर्व नागरिकांना वीजभरणा केंद्र आणि पाणीबिल भरण्यासाठी केंद्रावर गर्दी करण्याची शक्यता आहे. त्याला किमान एक महिना मुदतवाढ द्यावी. तसेच, असंघटित क्षेत्रातील रोजगाराद्वारे उदरनिर्वाह करणार्यांना मोफत धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

  • कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकार करत असलेल्या अनेक उपाययोजना अभिनंदनीयच आहेत. कारण कोरोनाचे संकट हे संपूर्ण मानवजातीवर ओढावलेले‌ संकट आहे. त्यामुळे या सर्व उपाययोजना गरजेच्याच आहेत. या रोगाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी ३१ मार्चपर्यंत शासनाकडून गर्दी टाळण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. मात्र, यानंतर एप्रिलच्या सुरुवातीला सर्वत्र वीज आणि पाणीबिल भरण्यासाठी नागरिकांकडून केंद्रावर गर्दी होऊ शकते. हे टाळण्यासाठी महावितरणाने ऑनलाईन वीजबिल भरण्याचे आवाहन केले आहे. मात्र, या प्रणालीबद्दल ग्रामीण भागातील अनेक नागरीक अनभिज्ञ आहेत. त्यामुळे त्यांना ऑनलाईन वीजबिल भरणे अशक्य आहे. त्यामुळे ही अडचण लक्षात घेऊन राज्य शासनाने वीजबिल आणि पाणीबिल भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, असे पाटील म्हणाले.

शासनाकडून सातत्याने गर्दी टाळण्याचे आवाहन होत आहे. मात्र, यामुळे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना शासनाने किमान दोन महिन्यांसाठी मोफत धान्य, आणि प्रतिदिन शंभर रुपये मेहनताना द्यावा, अशी सूचनाही पाटील यांनी केली.

सर्वसामान्यांना रेशनच्या दुकानातून माफक दरात अथवा मोफत मास्क आणि सॅनिटायजर उपलब्ध करून देण्याची मागणीही पाटील यांनी केली.

======================================================

इतर बातम्यांचाही मागोवा