सानपाडा य़ेथे शिवसैनिक भाजपमध्ये दाखल

विभागप्रमुखासह कार्यकर्त्यांचा शिवसेनेला झटका

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, ८ मार्च २०२०

नवी मुंबई महापालिकेतील सत्ता काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भाजपनेच शिवसेनेच्या गडाला भगदाड पाडण्यास सुरुवात केली असून सानपाडा येथील विभागप्रमुख गणपत उर्फ भाऊ भापकर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजप नेते गणेश नाईक यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. शिवसेनेतून झालेल्या या महागळतीमुळे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पक्षबांधणीसाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या सुमारास उमेदवारी देताना मात्र डावलण्यात येत असल्याचा आरोप करीत भाऊ भापकर भाजपमध्ये दाखल झाले आहेत. जुईनगर येथे भाजपचे युवा नेते आणि नवी मुंबई महापालिका ड प्रभाग समिती सदस्य सुनिल कुरकूटे यांच्यावतीने ७ मार्च रोजी महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात गणेश नाईक यांच्या उपस्थितीत भापकर आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये दाखल झाले. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला हा मोठा झटका मानला जात आहे.

या कार्यक्रमाला माझ्या नवऱ्याची बायको या प्रसिद्ध मालिकेतील राधिकाची भूमिका साकारणा-या अनित दाते या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याशिवाय महापौर जयवंत सुतार, माजी खासदार संजीव नाईक, सभागृह नेते रवींद्र इथापे, माजी उपमहापौर भरत नखाते, माजी नगरसेवक बाळाराम पाटील, समाजसेविका शैला पाटील, नम्रता कुरकुटे, समाजेवक राम मढवी, साईनाथ मढवी, राजेश ठाकूर, राजू वराळ,शिल्पा ठाकूर, आणि अन्य मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

आपल्या भाषणात गणेश नाईक म्हणाले की, सध्या अनेकजण घाबरले आहेत. त्यामुळे त्यांना तीन चारच्या गटाने फिरावे लागत आहे. मात्र त्याचा फायदा होणार नाही. कारण तीन तीगाडा काम बिघाडा होतो असे सांगत गणेश नाईक यांनी महाविकास आघाडीवर टिकेची झोड उठवली. या आघाड्या, तिघाड्यामध्ये  कोणाची कुणाला शाश्वती नाही. मात्र गणेश नाईकसोबत असणाऱ्याला आपण योग्य ठिकाणी असल्याचे माहीत आहे. त्या विश्वासावर सानपाड्यातील चारही जागा भाजपच जिंकणार असल्याचा विश्वास  नाईक यांनी व्यक्त केला.

२५-३० वर्षे  पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून राबलो.परंतु मागच्या तिन्ही निवडणुकांमध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना डावलून ज्येष्ठ नगरसेवक पदाधिकाऱ्यांनीच आपली वर्णी लावली.त्यामुळे आम्ही कार्यकर्ते वंचितच राहीलो. आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनाही जनसेवा करण्याची संधी मिळावी म्हणूनच शिवसेनेतून बाहेर पडलो आहे. आता गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवीन वाटचाल सुरू करून लोकांच्या प्रश्नांवर काम करणार असल्याचे भाऊ भापकर यांनी सांगितले.

भाऊ भापकर यांच्यासोबत सानपाडा शिवसेना उपविभागप्रमुख राजू दशरथ सैद, अशोकशेठ कवडे, माजी काँग्रेस विभाग अध्यक्ष सानपाडा नितीनशेठ भोर, प्रसाद शेठ विश्वासराव, ज्येष्ठ शिवसैनिक अशोकशेठ हुले, अशोकदादा खांडगे, रामदासशेठ आतकरी, भिवसेन पिंगळे, सिताराम बांगर, रवींद्र नहीरे, हनुमंत भैय्यै, सोपान लोखंडे आणि अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते अशा शेकडो जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

हळदी कुंकू कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आणि हजारो महिलांचे आकर्षण ठरलेल्या प्रमुख पाहुण्या अनिता दाते यांनी यानिमित्ताने महिलांशी संवाद साधला. उपस्थित हजारो महिलांमधून चिठ्ठी टाकून निवड झालेल्या महिलांना अनिता दाते यांच्या हस्ते नथ, पैठण्या, वॉशिंग मशीन आणि इतर आकर्षक पारितोषिके प्रदान करण्यात आली.

====================================================

इतर बातम्यांचाही मागोवा