नेरुळ येथे भरधाव कारची तीन गाड्यांना टक्कर
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- २९ फेब्रुवारी २०१९
पामबीच मार्गालगत सेक्टर २८ येथे कार, रिक्षा आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात एका वाहतूक पोलिसासह दोन जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११.४५ च्या सुमारास घडली.
पामबीच मार्गालत असणाऱ्या नेरुळ सेक्टर २८ मधील गगनगिरी चौकात वाहतूक पोलीस एका रिक्षाची तपासणी करीत असताना मागून आलेल्या भरधाव कारने रिक्षाला आणि पोलिसांच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. धडक एवढी मोठ्याने बसली की भरधाव कार पलटी झाली. या अपघातात वाहतूक पोलीस, रिक्षाचालक आणि कारचा चालकाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
या अपघातातील जखमींना त्वरीत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. स्थानिक समाजसेवक दिलीप आमले यांनी स्थानिक नागरिकांसह घटनास्थळी धाव घेत पोलिसांना मदतीचा हात दिला.
दरम्यान, पामबीच मार्गावर गेल्या काही दिवसांमध्ये वाहनांना अपघात होत आहेत. भरधाव वेगाने वाहने चालविली जात असल्यामुळे हे अपघात होत असून वाहतूक पोलिसांनी भरधाव वेगाने गाड्या चालविणाऱ्यांविरोधात आणि नियम तोडणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.
=====================================================
- इतर बातम्यांचाही मागोवा