15 हजार 358 लाभार्थ्यांचा समावेश
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- 24 फेब्रुवारी 2020, मुंबई
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेची पहिली यादी आज 24 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली. शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थ्यांचा समावेश आहे. एप्रिल महिन्याअखेर या योजनेच्या अंमलबजावणीचं काम पूर्ण करण्यात येणार आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यातील 34 लाख 83 हजार 908 खात्याची माहिती संकलित केली. त्यापैकी 68 गावातली यादी जाहीर करण्यात आली आहे. कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिलं जात आहे. जिल्हा पातळींवर कर्जमाफीचं काम सुरु झालं आहे.
राज्यातील बळीराजांना कर्जमुक्तीतून चिंतामुक्त करणाऱ्या या मोठ्या योजनेची अंमलबजावणी केवळ ६० दिवसात झाली. याचे श्रेय यंत्रणेला असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. ही योजना राबवितांना आपण शेतकऱ्यांवर काही उपकार करीत आहोत अशी भावना ठेवू नका. शेतकऱ्यांचे आशिर्वाद आपण या माध्यमातून घेत आहोत त्यामुळे आपण लाभार्थी आहोत. काही ठिकाणी अंमलबजावणी करताना उणिवा जाणवल्या तर शेतकऱ्यांनी नाराज होवू नये असे सांगतानाच शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेताना संमय ढळू देूऊ नका बळीराजाला दुखवू नका, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यंत्रणेला केली.
बळीराजा कर्जमुक्त व्हावा यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्याच भावनेतून ही योजना सुरू केली. कर्जमुक्त होऊन शेतकऱ्याला पुन्हा काळ्या आईची सेवा करता यावी. शेतीतून चांगले उत्पादन घेता यावे यासाठी राज्यशासनाने ही महत्वाकांक्षी योजना आणली. शेतकरी आनंदात रहावा त्याच्या मुलांच शिक्षण चांगल्या पद्धतीने व्हावं अशी आमची भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.