महिलांमधील कर्करोग निदानासाठी नवी मुंबईतील 111 प्रभागांमध्ये शिबीर

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

नवी मुंबई, 16 जानेवारी 2020

सध्याचे कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने कर्करोगाची लक्षणे आढळलेल्या महिलांसाठी टप्प्याटप्प्याने सर्व 111 प्रभागांमध्ये कर्करोग निदान शिबिराचे आयोजन केले आहे. नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, इंडियन कॅन्सर सोसायटी मुंबई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून 16 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीत सकाळी 10 ते सायं 4.00 या वेळेत महानगरपालिका क्षेत्रातील सर्व 111 प्रभागांमध्ये टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये कर्करोगाचे निदान झाल्यास आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या पुढील उपचारासाठीही मदत  करण्यात येणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आज पहिल्या टप्प्यात नागरी आरोग्य केंद्र, शिरवणे (प्र.क्र.81), नमुंमपा शाळा क्र. 46 गोठीवली गांव (प्र.क्र.24), समर्थ हेल्थ केअर, सेक्टर 19 ए नेरूळ (प्र.क्र.100) याठिकाणी शिबिरे आयोजित करण्यात आली होती.

यापुढील काळात 18 जानेवारी रोजी नागरी आरोग्य केंद्र दिघा (प्र.क्र. 9), गणपतीपाडा दिघा (प्र.क्र. 3), विष्णुनगर दिघा (प्र.क्र. 4) येथे शिबिरे होणार आहेत.

25 जानेवारी रोजी तुर्भे गांव अंगणवाडी (प्र.क्र.72), आग्रोळी सेक्टर 29 समाजमंदीर (प्र.क्र.101), नागरी आरोग्य केंद्र नेरुळ फेज 1 (प्र.क्र.80) येथे शिबिर संपन्न होत आहे.

26 जानेवारी रोजी चंद्राबाई चौगुले शाळा चिंचपाडा ऐरोली (प्र.क्र. 7) येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

27 जानेवारी रोजी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ यांचा दवाखाना सेक्टर 4 सी.बी.डी. बेलापूर (प्र.क्र.104), नागरी आऱोग्य केंद्र करावे (प्र.क्र.110) व डॉ. डिसूजा क्लिनिक खैरणे (प्र.क्र.42) येथे शिबिरे होणार आहेत.

28 जानेवारी रोजी डॉ. काटकर क्लिनिक खैरणे (प्र.क्र.43), नागरी आरोग्य केंद्र नेरूळ फेज 1 (प्र.क्र.88) आणि ज्येष्ठ नागरिक भवन सेक्टर 11 नेरूळ (प्र.क्र.90) येथे कर्करोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

29 जानेवारी रोजी माता बाल रुग्णालय तुर्भे (प्र.क्र.66), तेरणा क्लिनिक तुर्भे स्टोअर (प्र.क्र.70) आणि नागरी आरोग्य केंद्र चिंचपाडा (प्र.क्र. 8) येथे निदान शिबिर होत आहे.

31 जानेवारी रोजी रामनगर अंगणवाडी (प्र.क्र. 2), प्रवोधनकार ठाकरे विद्यालय इलठनपाडा (प्र.क्र. 5) व यादवनगर बुध्दविहार (प्र.क्र. 6) याठिकाणी शिबिर होणार आहे.

प्रत्येक शिबिरामध्ये 100 महिलांची कर्करोगाच्या अनुषंगाने प्राथमिक तपासणी करण्यात येत असून महिलांमध्ये आढळलेल्या मुख कर्करोग, गर्भाशय तोंडाचा कर्करोग, स्तन कर्करोग याच्या लक्षणांनुसार प्राधान्याने तपासणी करण्यात येत आहे.

=======================================================

इतर बातम्यांचाही मागोवा