तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनचे पनवेल आयुक्तांना साकडे

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ११ जानेवारी २०२०:

तळोजा औद्योगिक पट्ट्यातील उद्योगांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर तळोजा इंडस्ट्रीज असोसिशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. गणेश देशमुख यांची भेट घेतली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांच्यासह नवी मुंबई हॉटेल असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश शेट्टी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

  • महापालिका आयुक्त देशमुख यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सतीश शेट्टी यांनी उद्योगांना भेडसावणाऱ्या वाढत्या सेवा शुल्क तसेच मालमत्ता कराच्या वसुलीबाबत तोडगा काढण्याची विनंती केली. त्याचप्रमाणे एलबीटी कर वसुली प्रभावीपणे व्हावी यासाठी अभय योजना राबवावी. जेणेकरून उद्योगांनाही दिलासा मिळेल आणि महापालिकेच्या तिजोरीतही महसूलाची भर पडेल, असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला. त्यावर एलबीटीबाबत अभय योजना राबविण्याबाबत महापालिका आयुक्तांनी अनुकूलता दर्शविल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

तळोजा एमआयडीसी परिसरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जावी यासाठी महापालिकेने प्रयत्न करावे या कामी तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशननेदेखील सहकार्य करेल, असे आश्वासन असोसिएशनच्या शिष्टमंडळाने महापालिका प्रशासनाला दिले.

पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध आहेत. त्यामुळे तळोजा पट्ट्यातील हॉटेल व्यावसायिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले. त्यावर पुनः वापर करता येईल अशा प्लास्टिकच्या जाड कंटेनरला परवानगी मिळावी, जेणेकरून तशा प्रकारचे प्लास्टिक कंटनेर खरेदी केले जातील, असे हॉटेल संघटनेच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले. याप्रकरणी लवकरच योग्य तो तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

===============================================

इतर बातम्यांचाही मागोवा