अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई ७ जानेवारी २०१९
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने (एमटीडीसी) माळशेजघाट (जि. पुणे) येथील पर्यटक निवास येथे माळशेज पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १०,११,१२ जानेवारी रोजी होणाऱ्या या महोत्सवात पर्यटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन एमटीडीसीतर्फे करण्यात आले आहे.
- येणाऱ्या संक्रात सणाचे औचित्य साधून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १० ते १२ जानेवारी दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महोत्सवामध्ये सहभागी होण्याकरिता प्रती व्यक्ती ५० रूपये प्रवेश शुल्क आहे. महोत्सवाच्या ठिकाणी पतंग, मांजा व इतर साहित्य खरेदीसाठी स्टॉल असेल. हा महोत्सव प्रथमच आयोजित होत असून महोत्सवामध्ये बिन मांज्याचे पतंग, ड्रोन पतंगबाजी ही प्रमुख वैशिष्ट्ये असणार आहेत.
- राज्यातील एमटीडीसीच्या रिसॉर्टस् तथा पर्यटक निवासांचा आता कायापालट होत असून पर्यटकांना त्याकडे आकर्षित करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहीमेअंतर्गत माळशेजघाट येथे आतापर्यंत द्राक्षे महोत्सव, आंबा महोत्सव यांचे आयोजन करुन पर्यटकांना आकर्षित करण्यात आले आहे. आता पतंग महोत्सवाच्या माध्यमातून या पर्यटनस्थळाकडे पर्यटकांना पुन्हा आकर्षित करुन तेथील पर्यटनाला चालना देण्यात येत आहे, असे एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी सांगितले.
- महोत्सवामध्ये पर्यटकांना महिला बचतगटांच्या माध्यमातून बनविण्यात येणाऱ्या विविध स्थानिक खाद्य पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. ग्रामीण कलाकारांच्या कलाकृतींचे स्टॉलही उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सेंद्रीय खताद्वारे उत्पादित शेतमालाची विक्री करण्यात येणार आहे. आदिवासी नृत्य, महिला लेझीम पथक, गोफ कला अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून पर्यटकांना बैलगाडी सफारीचाही आनंद घेता येणार आहे.
अधिक माहितीसाठी माळशेजघाट पर्यटक निवासचे व्यवस्थापक विष्णु गाडेकर यांना ९३७३८०८१५१,७७६८०३६३३२, ९८८११४३१८०, ७०३८८९०५००, ९८२३७१४८७८ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे एमटीडीसीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
=====================================================
इतर बातम्यांचाही मागोवा