महाराष्ट्रातील तातडीचे प्रश्न सोडविण्यसाठी केंद्र सरकारने साहाय्य केले पाहिजे

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी 

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मुंबई, २ डिसेंबर २०१९

महाराष्ट्रातील जनतेला आनंदी, निरोगी जीवन जगता येईल असा विकास आपले सरकार करील अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिली. मुंबईसह -महाराष्ट्रातून दिड लाख कोटींचा महसूल केंद्राला मिळतो , त्यामुळे महाराष्ट्रातील तातडीचे प्रश्न सोडविण्यसाठी केंद्रसरकारने साहाय्य केले पाहिजे अशी आग्रही मागणीही त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटही सर्वांना सोबत घेऊन आवश्यकता भासल्यास घेऊ असेही उत्तर मुक्यमंत्र्यांनी दिले. 

विधिमंडळाचे विशेष अधिवेशन संस्थगित झाल्यावर विधानभवनातील पत्रकार कक्षात पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.  राज्याची आर्थिक स्थिती , सुरू असलेली विकासकामे यांचा लेखाजोखा सादर करण्यास आपण अधिका-यांना आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली. कोणती विकासकामे सुरू, कोणती तातडीची, कोणती तातडीची असताना त्याकडे दुर्लक्ष झाले याचीही माहिती मागवून प्राधान्यक्रम ठरवू असेही ते म्हणाले.

पत्रकारितेचे खोलवर असलेले जाळे राज्याच्या विकासार्थ साहाय्यकारी होऊ शकेल अशी अपेक्षाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

विरोधी पक्ष नेता हा शब्द आपणास खटकतो. समोर आहेत ते शत्रू नाहीत असे स्पष्ट करतानाच , सत्ताधिका-यांनीही आपल्या मस्तीत वागू नये असेही त्यांनी सांगितले.

==================================================

अविरत वाटचाल पेपर

===================================================

इतर बातम्यांचा मागोवा