- राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांसह दिग्गज नेते उपस्थित राहणार
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, १४ सप्टेंबर २०१९
राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य मेळावा उद्या १५ सप्टेंबर रोजी नेरुळच्या गणपतशेठ तांडेल मैदानावर होणार आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. नवी मुंबईतील वजनदार नेते गणेश नाईक यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा दणका बसला आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले असून शरद पवार काय बोलणार याची राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
शरद पवार यांच्या मनधरणीनंतरही गणेश नाईक, त्यांचे पुत्र माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, पुतण्या माजी महापौर सागर नाईक आणि राष्ट्रवादीचे ४८ नगरसेवक भाजपमध्ये गेले. गणेश नाईकांच्या या निर्णयामुळे नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा खड्डा पडला आहे.
पक्षाचे नेते शरद पवार यांनी ज्येष्ठ नगरसेवक अशोक गावडे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद सोपवून पक्षाला पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पक्षाचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील यांच्यावर पक्षबांधणीची जबाबदारी सोपवली आहे. त्याशिवाय उप जिल्हा प्रमुख अजय गुप्ता, ज्येष्ठ नेते चंदू पाटील, महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस भालचंद्र नलावडे, महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रतिनिधी मंगेश आमले, राष्ट्रवादीच्या वाहतूक सेनेचे विलासराव हुले पाटील आणि अन्य मंडळीची ताकद शरद पवारांनी उभी केली आहे.
नवी मुंबईतील पक्षाच्या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आ. जितेंद्र आव्हाड, आ. शशिकांत शिंदे, खा. अमोल कोल्हे आदी उपस्थित राहणार आहेत.
पक्षाचा हा मेळावा आम्ही यशस्वी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख अजय गुप्ता यांनी व्यक्त केला.
====================================================
इतर बातम्यांचाही मागोवा