गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशामुळे नवी मुंबईत भाजपाला मोठे पाठबळ

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

नवी मुंबई,11सप्टेंबर 2019

नवी मुंबईतले ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशामुळे नवी मुंबईत भाजपाला मोठे पाठबळ मिळणार आहे. नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत नगरविकासाची कामे मोठ्या प्रमाणात होतील. नवी मुंबई आणि पनवेल महापालिकेसोबत राज्य सरकारचे इंजिन जोडले गेले असल्याने या परिसराचा विकास जोमाने होणार असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबईत व्यक्त केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबईतले नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी आज अठ्ठेचाळीस नगरसेवकांसह भाजपात प्रवेश केला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

या कार्यक्रमाला महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्य मंत्री रवींद्र चव्हाण,सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आ.मंदा म्हात्रे,माजी आ. रामशेठ ठाकूर, भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

  • देश प्रगतीकडे वाटचाल करत आहे त्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय्य आणि प्रेरणा आहे. ज्याला काम करण्याची, देशाला पुढे नेण्यासाठी काम करायचे आहे त्यांना हे नेतृत्तव मान्य आहे. भाजपात महाभरती चालू आहे असं विरोधक म्हणतात मात्र दुस-या पक्षाने त्यांच्याकडे मेगा गळती का सुरू आहे याचं आत्मचिंतन करणे आवश्यक असल्याचाही टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. येत्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगल्या जागा मिळणार आहेत यात शंकाच नाही. या निवडणुकीत मिळालेल्या जागांमुळे कधीही सत्तेचा माज येणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
  • नवी मुंबईत घडलो त्या सर्वमान्य जनतेने कौल दिला, त्यामुळे नवी मुंबईची प्रगती होत राहिली असं मत व्यक्त करताना गणेश नाईक यांनी नवी मुंबईतल्या मूळ गावठाणांचा प्रश्नही मांडला. याआधी पालकमंत्री, मंत्री असतानाही या प्रश्नाला न्याय देऊ शकलो नाही ही खंत कायम राहिल, त्यामुळे गावठाणातील घरे, झोपडपट्टीमधील 60 हजार घरे, सिडकोची मोडकळीस आलेली घरे, एलआयजीमधील घरे यांबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा. स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने आणि त्यांच्यासोबत यापुढे कायम काम करणार असल्याचं गणेश नाईक यांनी यावेळी सांगितलं.

========================================================
इतर बातम्यांचाही मागोवा