एसटी-ट्रकच्या भिषण अपघातात १४  ठार,४५ जखमी 

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

धुळे,१९ ऑगस्ट २०१९

औरंगाबाद-शहादा मार्गावर रविवारी रात्री १०.१५ च्या सुमारास एसटी आणि ट्रकची समोरासमोर टक्कर होवून झालेल्या भिषण अपघातात एसटी आणि ट्रकमधील १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अंदाजे ४५ प्रवासी जखमी झाले आहेत. येथील निमगुळ गावाच्या आधी १ कि.मी.अंतरावर हा भिषण अपघात झाला आहे.

एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा आगारातील एसटी बस क्रमांक एमएच-२०, बीएल ३७५६ ही गाडी १८ ऑगस्ट रोजी रात्री औरंगाबाद-शहादा मार्गावर जात होती. या गाडीत एकूण ६५ प्रवासी होते. निमगुळ गावाच्या आधी एक कि.मी. अंतरावर रात्री १०.१५ च्या सुमारास एसटी आणि एका कंटेनरची (एपी २९-व्ही-७५७६ ) जोरात टक्कर झाली. ही टक्कर एवढी भिषण होती की, एसटीतील चालकासह १३ प्रवाशांचा मृत्यू झाला तर कंटेनरचा चालक असे एकूण १४ जण मरण पावल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. मुकेश पाटील असे एसटी चालकाचे नाव आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पंचनामा केला आहे.

====================================================

इतर बातम्यांचाही मागोवा