-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, ३१ जुलै २०१९:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात परिवर्तन होत असल्याचे सामान्य जनतेने अनुभवल्यामुळे जनता भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देत असून भविष्यकाळात आपल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यात विकास पोहचवायचा असेल तर त्यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये गेले पाहिजे या जाणीवेने विविध पक्षांचे नेते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत केले.
- विविध पक्षांच्या मान्यवर नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री व ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, छत्रपती आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. कालिदास कोळंबकर, आ. संदीप नाईक, आ. वैभव पिचड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला अध्यक्ष चित्रा वाघ, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, महात्मा फुले यांच्या वंशज नीता होले व माजी पोलीस अधिकारी साहेबराव पाटील यांच्यासह विविध कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
- प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पणनमंत्री राम शिंदे, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण,मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. राज पुरोहित व मंदा म्हात्रे तसेच मुंबई म्हाडा अध्यक्ष मधू चव्हाण उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात परिवर्तन घडत आहे व त्यासोबतच देश सक्षम होत आहे. त्यामुळे समाजातील सर्व थरातील जनतेचे भाजपाला समर्थन आहे. आपल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यात विकास पोहचवायचा असेल तर भाजपामध्ये गेले पाहिजे, याची नेत्यांना जाणीव झाली आहे. भाजपामध्ये प्रवेश करण्यास अनेकजण इच्छुक आहेत. पदाकरता नव्हे तर विकासासाठी विविध नेते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भाजपा महायुती सरकारच्या काळात गेल्या पाच वर्षांत झालेले महत्त्वाचे निर्णय आणि विकासकामे पाहून विविध पक्षांच्या नेत्यांची खात्री पटली आहे की, भाजपाच्या माध्यमातूनच आपल्या भागाचे विकासाचे प्रश्न सुटतील. आज भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांप्रमाणेच आणखी अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश करतील. आपण आश्वस्त करतो की, भाजपामध्ये कोणताही दुजाभाव करण्यात येणार नाही व नेत्यांना त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणे स्थान मिळेल. आपल्याला आपल्या भागाचा विकास करता येईल.
=========================================
इतर बातम्यांचाही मागोवा