अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, ३१ जुलै २०१९:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा गुरुवार, 1 ऑगस्टपासून अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून सुरू होत आहे. त्यावेळी संरक्षणमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.
राज्य सरकारच्या पाच वर्षांतील कामांचा हिशोब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेस गुरुवारी प्रारंभ करत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कर्मस्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून १ ऑगस्टपासून यात्रेस प्रारंभ होणार आहे. लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून ही यात्रा सुरू होत आहे. यात्रेचा समारोप ३१ ऑगस्ट रोजी नाशिक येथे होणार आहे.
एक ते नऊ ऑगस्ट दरम्यान विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र येथे पहिला टप्पा होणार असून या भागातील एकुण १४ जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान ५७ विधानसभा मतदार संघातून १,६३९ किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचा समारोप नंदुरबार येथे होणार आहे.
यात्रेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्ट रोजी सुरु होईल. दुसऱ्या टप्प्यांत ही यात्रा १८ जिल्ह्यातल्या ९३ विधानसभा मतदारसंघात २,७४५ किलोमीटर एवढा प्रवास करणार आहे. यात्रेचा एकूण प्रवास ३२ जिल्ह्यांतून ४,३८४ किलोमीटर एवढ्या अंतराचा असणार आहे. दोन्ही टप्पे मिळून १५० विधानसभा मतदारसंघांमधून ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान ८७ मोठ्या सभा, ५७ स्वागत सभा होणार आहेत. याशिवाय एकुण २३८ पेक्षा अधिक गावांमध्ये स्वागत स्वीकारून यात्रा नाशिक येथे पोहोचेल. या यात्रेचे प्रमुख प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर आहेत.
यात्रेच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील कामगिरीचे दर्शन घडविणारा एलईडी रथ यात्रेबरोबर असणार आहे. यात्रेदरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. यात्रा ज्या-ज्या जिल्ह्यांतून प्रवास करेल तेथे त्या-त्या जिल्ह्यांतील मंत्री, लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
========================================================