स्वच्छ सर्वेक्षण अंंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेला विशेष पुरस्कार

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, 23 जुलै 2019:

राष्ट्रीय पातळीवरील अमृत शहरांच्या प्रवर्गात 2018 मध्ये नवी मुंबई महापालिकेने नवव्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर येत उंचावलेले मानांकन आणि देशातील अमृत शहरांमध्ये पहिल्या दहांमध्ये येण्याचा मान पटकावणारी नवी मुंबई महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका आहे. नवी मुंबई महापालिकेने राज्यात सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान कायम राखला. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र नागरी विकास संचालनालय, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेस स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्या सन्माननीय उपस्थितीत, विशेष पुरस्कार प्रदान करीत सन्मानीत करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर जयवंत सुतार यांनी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, तत्कालीन माजी आयुक्त डॉ. रामास्वामी एन., घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त तुषार पवार स्वच्छ नवी मुंबई मिशन तदर्थ समिती सभापती नेत्रा शिर्के यांनी हा पुरस्कार स्विकारला.

  • सन 2002 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान सुरू झाल्यापासून व पुढे स्वच्छ भारत मिशन सुरू झाल्यानंतरही नवी मुंबई महानगरपालिकेने आपले स्वच्छतेचे मानांकन सतत उंचावत ठेवले आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्येही राज्यात सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान कायम राखत देशात सहभागी 4237 शहरांमधून सातव्या क्रमाकांचे मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेने पटकाविले. त्यासोबतच “नागरिक प्रतिसाद (Citizen Feedback) क्षेत्रात देशातील सर्वोत्तम शहराचा पुरस्कारही नवी मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झाला. स्टार रेटिंगच्या निकषानुसार नवी मुंबई महानगरपालिका थ्री स्टार रेटिंगची मानकरी ठरली असून हागणदारीमुक्त शहरामध्येही नवी मुंबई महानगरपालिकेस ओडीएफ डबल प्लस रेंटिंग प्राप्त झाले आहे.

महापौर जयवंत सुतार यांनी या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करीत यामध्ये सुजाण आणि स्वच्छताप्रेमी  नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रीय सहभागाचा महत्वाचा वाटा असल्याचे सांगत हा पुरस्कार तमाम नवी मुंबईकर नागरिकांना समर्पित केला. लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार यांनी यादृष्टीने चांगले काम केल्याचा उल्लेख करीत यापुढील काळात राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वोत्तम तीन शहरांमध्ये येण्याचा प्रयत्न राहील असे महापौरांनी सांगितले.

महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी कोणतेही यश संपादन करताना त्यामध्ये सांघिक भावनेचा मोठा सहभाग असतो असे सांगत शहर स्वच्छतेकरिता सर्व लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी – कर्मचारी, सफाई कामगार तसेच नागरिकांनी एकात्म भावनेने दिलेल्या सक्रीय योगदानामुळेच नवी मुंबई महानगरपालिका नेहमी पुरस्कार प्राप्त करीत असते असे सांगितले. आगामी स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये देशात पहिल्या तीन क्रमांकात नवी मुंबई शहर असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला व यासाठी सर्वांनी सज्ज होऊया असे आवाहन केले.
  • ज्यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात हे मानांकन महानगरपालिकेस प्राप्त झाले असे तत्कालीन माजी आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी नवी मुंबईतील नागरिक हे सुसंस्कृत असल्याने शहराच्या विकासासाठी आपले योगदान देण्यासाठी सदैव तत्पर असतात असे सांगत सर्वेक्षणाच्या अनुषंगाने शहरात उभी राहणारी स्वच्छतेची चळवळ कायमस्वरूपी सवय व्हावी असा निश्चय आपण करायला हवा असे आवाहन केले.

===================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा
 स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये नवी मुंबई देशात पहिल्या तीन क्रमांकात हवी