नेरुळ येथे आज विठ्ठल दर्शन सोहळा

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, १२ जुलै २०१९ :

पंचपरमेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट, श्री विठ्ठल रखुमाई सेवा भावी संस्था, नेरुळ यांच्या विद्यमाने आषाडी एकादशीनिमित्त आज १३ जुलै रोजी श्री विठ्ठल दर्शन सोहळ्याचे आयोजन कऱण्यात आले आहे. नेरुळ सेक्टर १० मधील पंचपरमेश्वर मंदीरात हा कार्यक्रम होणार आहे.

  • शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर यांचे वडील वारकरी  होते. त्यांनी हा विठ्ठल दर्शन सोहळा २००८ पासून नेरुळमध्ये सुरु केला होता. गेली १२ वर्षे हा सोहळा सुरू असून आता वडीलांची ही परंपरा पुढे नेण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे घोडेकर यांनी सांगितले.
विठ्ठल दर्शन सोहळा कार्यक्रमात सकाळी ७ वाजता विठ्ठल रखुमाई मुर्तीचा अभिषेक आणि पूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर पालखी सोहळ्याचे आगमन होणार आहे. यावेळी महिलांचा भजन आणि भावगीतांचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर भाविकांना फराळ वाटप कऱण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर यांनी दिली.

या विठ्ठल दर्शन सोहळ्याला सर्व भाविकांनी हजेरी लावावी आणि विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासह प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन दिलीप घोडेकर यांनी केले आहे.