प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकारांसाठी म्हाडाच्या माध्यमातून घरे देणार

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
सोलापूर, १२ जुलै २०१९ :

पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्य शासन सकारात्मक असून राज्यातील प्रत्येक जिल्हयातील पत्रकारांसाठी  म्हाडाच्या विशेष योजनेच्या माध्यमातून  घरे उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११ जुलै रोजी केले.सोलापूर येथील श्रमिक पत्रकारांसाठी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, पुणे व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरात 238 सदनिका बांधकामाचे भूमीपूजन फडणवीस यांच्या हस्ते  झाले.  त्यावेळी तो बोलत होते.

  •  पत्रकारांच्या कल्याणासाठी पत्रकार सन्मान योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असून राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना या योजनेच्या माध्यमातून निश्चितच दिलासा मिळेल.  राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत पत्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.  या योजनेचा लाभ राज्यातील पत्रकारांना होणार असल्याचे सांगतानाच 1100 आजारांवर या योजनेच्या माध्यमातून उपचार मिळणार  आहेत. सोलापूर पत्रकार संघाच्या रुपाने महाराष्ट्रात गृहनिर्माणाची ही पहिली योजना आज कार्यान्वित झाली. त्यामुळे पुढच्या योजना नक्कीच सुकर होतील. सोलापूरच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यात पत्रकारांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी योजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

  • बाजारभावाच्या तुलनेत म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणे आवश्यक आहे. तसेच या घरांसोबतच पत्रकारांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत सदनिकांच्या किंमतीही कमी करण्याबाबतचा निर्णयही लवकरच घेण्यात  येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

======================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा