- रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे आ.नितेश राणे संतप्त
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
कणकवली, ४ जुलै २०१९
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबई- गोवा महामार्गाची अतिशय दयनिय अवस्था झाली असून नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची भावना पसरली आहे. यापार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचे आमदार नितेश राणे आणि स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंत्याची कानउघडणी करीत अंगावर चिखल ओतला. त्यानंतर या उपअभियंत्याला पुलाला दोरीने बांधून तातडीने रस्त्याची डागडुजी करण्यास सांगितले. याबाबतचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
- आज सकाळी आमदार नितेश राणे महाामार्गाच्या कामाची पाहणी करत असताना त्यांना सर्व्हिसरोडची कामे अपूर्ण अवस्थेत दिसली. त्यामुळे महामार्ग उप अभियंता प्रकाश खेडेकर यांना राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आ.राणे यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी खेडेकर यांना गडनदी पुलाला बांधून ठेवले एवढेच नव्हे तर सर्वसामान्य जनता रोज जो चिखल मारा सहन करतोय तो तुम्ही पण आज अनुभवावा असे म्हणत आमदारांनी शेडेकर यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या. कणकवली नगरी तुंबवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असे विचारत आमदार नितेश राणे यांच्यासह स्वाभिमान कार्यकर्त्यांनी अभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदी पूल ते जाणवली पूल पर्यंत पायी चालत नेऊन चिखल आणि खड्ड्यांची वस्तुस्थिती दाखवली आहे.
दरम्यान, मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत संथगतीने सुरू असून रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या पार्श्वभूमीवर वाहने चालविताना चालकांना कमालीची कसरत करावी लागत असून गाड्यांच्या देखभालीचा खर्चही वाढणार असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीची भावना आहे.
=================================================
- इतर बातम्यांचाही मागोवा