मुख्यमंत्र्यांची विधानसभेत लेखी उत्तराद्वारे माहिती
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, 19 जून 2018:
कोकणात प्रस्तावित असलेल्या महातेल शुध्दीकरण प्रकल्प अर्थात नाणार प्रकल्पाला रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला होता. त्यानंतर या प्रकल्पासाठीचे भूसंपादन रद्द करण्यात आले होते. आता हा प्रकल्प रायगड जिल्हातील चार तालुक्यांमधील नवनगर विकास परिसरात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत लेखी उत्तराद्वारे दिली आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, रोहा, श्रीवर्धन या चार तालुक्यातील ४० गावातील सुमारे १३४०९.५२ हेक्टर जमिनीवर एकात्मिक औद्योगिक वसाहत विकसित करण्याचा सिडकोचा मानस आहे. सिडकोच्या प्रस्तावाला अनुसरून शासन अधिसूचना १९ जानेवारी २०१९ अन्वये सदर क्षेत्र औद्योगिक वसाहत नवनगर क्षेत्र म्हणून अधिसूचित करून, अधिसूचित क्षेत्राच्या विकासासाठी सिडकोची नवनगर विकास प्राधिकरण म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
नवनगर विकास प्राधिकणांतर्गत अधिसूचित जमिनीचे भूसंपादन करण्याच्या अनुषंगाने भूमिअभिलेख जिल्हाधिकारी,रायगड यांच्या कार्यालयाकडून कागदपत्रे सिडकोकडून मागविण्यात आले असून अद्याप ४० गावांतील ग्रामस्थांनी भूसंपादनाला विरोध केलेला नाही. तसेच उद्योग विभागाच्या अभिप्रायानुसार या प्रकल्पाला विरोध तसेच शेतक-यांच्या मागण्या याबाबत कोणतीही बाब निदर्शनास आली नाही असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
महातेल शुध्दीकरण प्रकल्पासाठी रायगड जिल्हातील चार तालुक्यांमधील ४० गावांतील ४८०२०.६ इतकी जमीन संपादनासाठी अधिसूचित केल्याचे मार्च २०१९ मध्ये निदर्शनास आले आहे याबाबत राज्यातील आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे खुलासा मागितला होता त्यावर मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली आहे.