- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासपूर्व कामातील महत्वाचा टप्पा
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, 18 जून 2019:
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील विकासपूर्व कामांमधील उलवे नदीचा प्रवाह वळविणे हे तुलनेने महत्त्वाचे व आव्हानात्मक काम पूर्ण करण्यात आले आहे. विमानतळ परिसराजवळील गावांमध्ये पावसाळ्यात उद्भवणारी पूरसदृश परिस्थिती टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनां विषयी शिफारसी करताना केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन, पुणे यांनी उलवे नदीचा प्रवाह बदलण्याची शिफारस केली होती. त्यानुसार उलवे नदीचा प्रवाह वळविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. गाभा क्षेत्रातील 96 मी. उंचीच्या डोंगराचे सपाटीकरण करून त्याला झीरो लेव्हलवर आणून त्या जागेतून 3.2 कि.मी. चा मार्ग (चॅनेल) काढून उलवे नदीचा प्रवाह वळविण्यात आला आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी विमानतळ प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील विकासपूर्व कामांची नुकतीच पाहणी केली आणि झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी आर. बी. धायटकर, मुख्य अभियंता (नमुंआंवि); एन. सी. बायस, अति. मुख्य अभियंता;. प्रणित मूल व संजय दाहेदार, अधिक्षक अभियंता; प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी आणि. एस. एस. गोसावी, कार्यकारी अभियंता हेदेखील उपस्थित होते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासारखा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा प्रकल्प रायगड जिल्ह्यातील व पनवेल तालुक्यातील दहा गावांतील जमीन संपादित करून आकारास येत आहे. सिडकोतर्फे जीव्हीके प्रणित नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. या सवलतधारक कंपनीस विमानतळ उभारणीच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
विमानतळ क्षेत्रात एप्रिल, 2017 पासून सिडकोतर्फे विकासपूर्व कामांना सुरूवात करण्यात आली आहे. विकासपूर्व कामांमध्ये उलवे टेकडीचे सपाटीकरण, उलवे नदीचा प्रवाह वळविणे, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे यांचा समावेश आहे. सिडको आणि सवलतधारक कंपनी यांच्यात झालेल्या नोव्हेशन करारानंतर विमानतळ गाभा क्षेत्राचे हस्तांतरण सिडकोतर्फे सवलतधारक कंपनीस करण्यात आले आहे. यामुळे सद्यस्थितीत गाभा क्षेत्रातील विकासपूर्व कामे सवलतधारक कंपनीमार्फत पार पाडण्यात येत आहेत.
——————————————————————————————–
इतर बातम्यांचाही मागोवा