अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई ,१८ जून २०१९ :
लोकसभा निवडणूकीत राज्यातील जनतेने भाजपाला भरभरुन मतदान करुनही त्यांची झोळी मात्र रिकामीच ठेवण्याचे काम राज्यातील भाजप सरकारने केले असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थ संकल्पानंतर दिली आहे.मागील चार वर्ष संकटात असलेल्या शेतकऱ्यांची निराशा आणि युवकांचा भ्रमनिरास करणारा अर्थसंकल्प असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.
- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची, ठोस आर्थिक मदतीची अत्यंत निकड असताना सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्याला बगल देण्यासाठी काहीशा कोटींची तरतूद करुन मुळ प्रश्नावरुन लक्ष विचलीत करण्याचा सरकारने प्रयत्न केला असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.
कालच्या आर्थिक पाहणी अहवालातूनच सरकारच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहेत. आजचा अर्थसंकल्प हा कोणतेही नावीन्य नसलेला… जुन्याच योजनांची उजळणी करणारा आहे. पीक वीमा योजनेत २२०० कोटी रुपये भरपाई दिल्याचे सांगणारे अर्थमंत्री विमा कंपन्यांनी ३३०० कोटी रुपयांचा नफा लुटुन नेल्याचे मात्र लपवून ठेवत आहेत. शेतकरी, बेरोजगारांप्रमाणेच कोतवाल, आशावर्कर, अंगणवाडीसेविका, पोलीस पाटील, संगणक परिचारक अशा विविध मानसेवी कर्मचाऱ्यांना मानधन वाढीसंदर्भात या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र या सर्वांना उपेक्षित ठेवण्याचे कामही सरकारने केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा साधा उल्लेखही या अर्थसंकल्पात केला नसून सर्वच घटकांची निराशा करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
==============================================
इतर बातम्यांचाही मागोवा