- राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप के. हाथीबेड
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, 12 जून 2019 :
राज्यातील सफाई कर्मचारी व त्यांच्या वारसांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देणार असल्याची माहिती राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप के. हाथीबेड यांनी दिली. सह्याद्री अथितीगृह येथे पत्रकार परिषदेत हाथीबेड बोलत होते. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप के. हाथीबेड हे राज्याच्या दौऱ्यावर आले होते.
- ठाणे व पालघर जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या दुर्घटनेत सहा सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता, त्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना तात्पुरती स्वरुपात नोकरी देण्यात आली आहे. राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी लाड-पागे समितीच्या शिफारशींचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी सर्व विभागांच्या सचिवांशी चर्चा केली आहे. राज्यातील महानगरपालिकांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांसाठी सफाई करताना दुर्घटना घडू नये यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी एक चित्रफित तयार केली जाणार आहे.
- राज्यातील सफाई कर्मचारी व त्यांचे कुटंबीय यांच्या उन्नतीकरीता राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्तीय विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळांच्या योजनांची अंमलबजावणी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ करणार आहे. या महामंडळांतर्गत राज्यात सफाई कर्मचाऱ्यांना व्यवसायाकरीता विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहे.
- आज सह्याद्री अतिथीगृह येथे राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप के. हाथीबेड यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या संघटनांची बैठक पार पडली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी दौंड व सफाई संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
======================================================
इतर बातम्यांचाही मागोवा