१० च्या परीक्षेत नवी मुंबई महापालिकेच्या शाळांचा निकाल ६८.३२ टक्के

  • इ.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्राचा निकाल 100 टक्के   

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

नवी मुंबई, ९ जून २०१९:

मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी एस.एस.सी. बोर्ड परीक्षेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या 17 माध्यमिक शाळांचा सरासरी निकाल 68.32 टक्के लागला असून नमुंमपा माध्यमिक शाळा,सेक्टर 7, कोपरखैरणेची ईश्र्वरी भानुदास रणवरे ही  विद्यार्थिनी 92.40 टक्के गुण संपादन करुन नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये सर्वाधिक गुण संपादन करणारी विद्यार्थी ठरली आहे. माध्यमिक शाळा, कोपरखैरणे सेक्टर 5 (हिंदी माध्यम) येथील भारती हरिशंकर गुप्ता ही विद्यार्थिनी 91.40 टक्के गुण संपादन करुन महापालिका शाळांमध्ये व्दितीय तसेच फातिमा कासिम अन्सारी ही माध्यमिक शाळा, नेरुळची विद्यार्थिनी 91.00 टक्के गुण प्राप्त करुन तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे. महापौर जयवंत सुतार व महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. आणि सर्व पदाधिकारी,नगरसेवक यांनी सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

  • सन 2006-2007 या शैक्षणिक वर्षापासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांतून विद्यार्थी इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा देत आहेत. यावर्षी महानगरपालिकेच्या 17 शाळांमधून 2248 विद्यार्थी दहावी बोर्ड परिक्षला बसले असून 68.32 टक्के इतका महानगरपालिका शाळांचा सरासरी निकाल लागला आहे.

 

इटीसी केंद्राचा निकाल 100 टक्के
  • अशाचप्रकारे महानगरपालिकेचा इ.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्र हा अभिनव उपक्रम देशापरदेशात नावाजला जात असून या केंद्राचा निकाल यावर्षीही 100 टक्के लागलेला आहे. केंद्रातील मनाली समेळ या कर्णबधीर विद्यार्थिनीने मराठी माध्यमातून 81.60 टक्के गुण संपादन केले असून प्रमिशा वासनिक या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थिनीने 74 टक्के तसेच दक्ष ओबेरॉय या इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्याने 70 टक्के गुण प्राप्त केले आहेत.

 

  • इ.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्रातील सुधार उद्देशक वर्गांमध्ये पूर्ण वेळ शिक्षण घेऊन सर्वसामान्य शाळेतून परिक्षा दिलेल्या अध्ययन अक्षम दिव्यांग प्रवर्गातील 4 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी संपादन केली आहे.

======================================================

इतर बातम्यांचाही मागोवा