फूटपाथवर बसलेल्या तिघांना भरधाव वाहनाची धडक

सीवूडस् मधील घटना, दोघांचा मृत्यू

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

नवी मुंबई, 4 जून 2019 :

नेरूळ सेक्टर 50 इथे पामबीच मार्गालगत असलेल्या सर्विस रोडवर सोमवारी रात्री एका भरधाव वाहनाने फुटपाथवर बसलेल्या 3 जणांना धडक दिली. यामध्ये आई, मुलगा आणि नात या तिघांचा समावेश आहे. त्यातील मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.

सोमवारी (3 जून) रात्री सेक्टर 50 इथे असलेल्या सर्विस रोडवर अमोल पाटील त्यांची आई ललिता पाटील, आणि त्यांची नात असे तीघे या ठिकाणी फिरण्यासाठी आले होते. रात्री 11 वाजता  ललिता पाटील आणि त्यांची नात फुटपाथवर आणि अमोल स्कूटीवर बसून बोलत असताना भरधाव वेगात आलेल्या एका कारने या तिघांना जोरदार धडक दिली. या धडकेत अमोल यांचा जागीच मृत्यू झाला. तर ललिता यांनाही जबर दुखापत झाली. त्यांना वाशीच्या फोर्टीस रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे आज सकाळी ह्द्यविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कार चालक आमीर मोहंमद इस्माईल याला एनआरआय पोलिसांनी अटक केली आहे.