अविरत वाटचाल न्यूजनेटर्क
नवी मुंबई, ३ एप्रिल २०१९:
प्लास्टिक पिशव्या विक्री करणा-या व्यावसायिकांवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कारवाईचा धडाका लावण्यात आला असून आजही सेक्टर 23 दारावे येथे 5 टन तसेच तुर्भे एपीएमसी मार्केट येथे 3 टन प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या व्यवसायीकांकडून दंडापोटी 55 हजार इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे.
तुर्भे ए.पी.एम.सी. मार्केट मध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणा-या व्यावसायिकांवर धडक कारवाई करीत असताना या पिशव्यांचा पुरवठा करणा-या व्यावसायिकाची माहिती मिळाल्यानुसार महानगरपालिकेच्या प्लास्टिक प्रतिबंधक पथकाने त्याच्यावरही धडक कारवाई केली. यामध्ये प्लास्टिक पिशव्या विक्री करणा-या दुकानदारांकडून 1.5 टन तसेच त्याचा घाऊक पुरवठा करणा-या शोभा ट्रेडिंग या व्यावसायिकावर छापा टाकीत 1.5 टन प्लास्टिक पिशव्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. अशाप्रकारे एकूण 3 टन प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करतानाच त्यासोबत रू. 50 हजार इतकी दंडात्मक रक्कमही वसूल करण्यात आली.त्याचप्रमाणे बेलापूर विभागातील दारावेगाव, सेक्टर 23 येथे भाड्याने गोडाऊन घेऊन प्लास्टिक पिशव्यांचा साठा करून ठेवल्याची खबर बेलापूर विभाग कार्यालयास लागल्यावरून धडक कारवाई करीत त्याठिकाणी 5 टन इतक्या मोठ्या प्रमाणात असलेला निरनिराळ्या स्वरूपाच्या प्लास्टिक पिशव्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला, तसेच 30 हजार इतकी दंडात्मक रक्कमही वसूल करण्यात आली.
- महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त रविंद्र पाटील व महावीर पेंढारी यांच्या नियंत्रणाखाली, परिमंडळ 1 चे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तुषार पवार यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
होळीपासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवायांनी जोर धरला असून आज एका दिवसात दोन विभागांत 8 टन इतका माल जप्त करण्याची कामगिरी करण्यात आली आहे.
=================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
उन्हाळी सुट्टीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या
https://goo.gl/gej5s8