- टॅगलाईन -‘आओ मिलके देश बनायें`… `हमारा आपका हम सबका भारत`
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई ,२५ मार्च २०१९:
लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी, युवा, महिला यांना केंद्रबिंदू ठेवत आपला राष्ट्रीय जाहीरनामा आज प्रसिद्ध केला. तीन भाषेतील जाहिरनामा समितीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जाहिर केला. या जाहिरनाम्याच्या कव्हर पेजवर आओ मिलके देश बनायें हा विषय घेण्यात आला आहे तर दुसर्या टॅगलाईनमध्ये जातीधर्म, भाषा, प्रांत एकत्र घेवून ही संकल्पना तयार करण्यात आली आहे. शिवाय शेतकरी, युवा, महिला हा केंद्रबिंदू ठेवण्यात आल्याचेही दिलीप वळसे पाटील म्हणाले.आघाडी सरकारच्या काळात जे कार्य करण्यात आले त्यासंदर्भाचा समावेश या जाहिरनाम्यात करण्यात आला आहे असेही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
- मागील लोकसभा निवडणुकीत एनडीएने जो दावा केला होता भ्रष्टाचार समुळ नष्ट होण्याऐवजी भांडवलशहांशी केलेल्या गळा मैत्रीचे नवेच रुप त्याने धारण केले आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या राफेल खरेदी व्यवहाराने देशाच्या विवेकबुद्धीला हादरे दिले आहेत असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले.
पाच वर्षात राजकीय हेतूने घटनात्मक स्वायत्त संस्थांची तोडफोड करण्यात आली आहे. शेती आणि शेतकर्यांवर हलाखीची परिस्थिती निर्माण केली आहे. अर्थ व्यवस्थेचा मंदावलेला वेग, बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ, देशावरील कर्जात दुपटीने वाढ, परराष्ट्र धोरण भरकटले आहे.महागाई, वाढत्या किंमती, नोटबंदीच्या निर्णयाने शेतकर्यांची दुर्दशा झाली आहे, असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले. - जात, संप्रदाय आणि धर्माच्या आधारे समाजात दुही माजवून स्वतः च्या लाभासाठी घेतला जात असून त्यामुळे लोकशाही संकटातून जात आहे. राष्ट्रवादाचा वापर लोकांमध्ये फुट पाडण्यासाठी केला जातोय. आपले मत उघडपणे मांडणे धोकादायक ठरु लागले आहे. सरकारला त्याच्यावरील टिका सहन होत नाहीय असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले.
- चार वर्षात कृषी क्षेत्राच्या सरासरी वार्षिक जीडीपीतील वाढ फक्त २.५ टक्के आहे. वाढीचा हा दर युपीए सरकारच्या शेवटच्या चार वर्षात ५.२ टक्के इतका मंदावला आहे. कर्जबाजारीपणा, आत्महत्यांचे वाढते प्रमाण आणि शेतमालाला पुरेशी किंमत न मिळाल्याने शेतकरी समुदायावर कुर्हाड कोसळली आहे. राष्ट्रवादी कृषीक्षेत्र विकासाकडे, उत्पादकता, उत्पन्न आणि बाजारपेठेची उपलब्धता वाढविण्यासाठी पुरेसे लक्ष देणार आहे, असे आश्वासन दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी दिले.
- याशिवाय आर्थिक विकास, रोजगार निर्मिती, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवर भर, कामगार कायद्यात सुधारणा, कर सुधारणा, मानव संसाधन विकास, आरोग्याचा हक्क, महिला व बाल कल्याण, युवा आणि क्रीडा, ज्येष्ठ नागरीक, परराष्ट्र धोरण, नागरी विकास, ग्रामीण विकास आणि पंचायत राज, वाहतूक, पर्यावरण, सामाजिक न्याय, अल्पसंख्यांक, लोकशाही संस्थांची चौकट बळकट करताना, मनरेगा, जल आणि सिंचन विकास, उत्पन्नातील असमानता या विषयावर भर देण्यात येणार असल्याचेही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे,डॉ. समीर दलवाई, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, सुधीर भोंगले,प्रवक्ते महेश चव्हाण उपस्थित होते.
========================================================
- इतर बातम्यांचाही मागोवा