सिडको गृहनिर्माण योजनांतील थकीत रक्कम भरण्यास मुदतवाढ

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, १८ मार्च २०१९:

सिडको महामंडळाने राबविलेल्या गृहनिर्माण योजनांकरिता काढण्यात आलेल्या संगणकीय सोडती दरम्यान यशस्वी ठरलेल्या अर्जदारांस थकीत रकमेचा भरणा करण्यास 25 मार्च, 2019 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिडको संचालक मंडळाच्या 24 डिसेंबर, 2018 रोजी पार पडलेल्या बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला.

  • गृहनिर्माण योजनांतील ज्या यशस्वी अर्जदारांनी अद्याप सदनिकेच्या किंमतीपोटी आकारण्यात येणाऱ्या रकमेचा भरणा केला नसेल अशा अर्जदारांनी विलंब शुल्कासह या रकमेचा भरणा 25 मार्च, 2019 पर्यंत करावा. विहित मुदतीत रकमेचा भरणा करण्यास अर्जदार असमर्थ ठरल्यास वाटपपत्रामधील जोडपत्रातील अट क्र. 2 व नवी मुंबई जमीन विनियोग (सुधारित) विनिमय-2008 च्या कलम 14(i) मधील तरतुदीनुसार अशी प्रकरणे अंतिमत: निकाली काढण्यात येतील. तसेच यापुढे सदर प्रकरणी कुठल्याही प्रकारचे पत्रव्यवहार थकीत अर्जदारांस महामंडळामार्फत केले जाणार नाही व कोणत्याही सबबीवर या प्रकरणांचा पुनर्विचार करण्यात येणार नाही याची अर्जदारांनी नोंद घ्यावी, असेही सिडकोने कळविले आहे.
  • तसेच स्वप्नपूर्ती व मनपसंत गृहनिर्माण योजनेतील प्रतिक्षा यादीवरील ज्या अर्जदारांस अद्यापपर्यंत  वाटपपत्र निर्गमित झाले नसेल त्यांनी पणन विभाग-2, रायगड भवन, तिसरा मजला, सीबीडी बेलापूर येथे दि. 30 मार्च, 2019 पूर्वी प्रत्यक्ष भेट देऊन सद्यस्थिती तपासून घ्यावी. 31 मार्च, 2019 नंतर सदर दोन्ही गृहनिर्माण योजनांची प्रतिक्षा यादी संपुष्टात येईल व तद्नंतर कोणत्याही परिस्थितीत अर्जदारांचे वाटपपत्र देण्याबाबत विचार केला जाणार नाही.
  • सिडको महागृहनिर्माण योजना- ऑगस्ट 2018 मधील सदनिका वाटपाबाबतची माहिती  www.lottery.cidcoindia.com व www.cidco.nivarakendra.in या संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबतच्या अधिक माहितीकरिता प्रॉबेटी सॉफ्ट प्रा.लि. यांच्या कॉल सेंटरशी 022-20871183 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच सदर योजनेच्या सोडतीमधील अयशस्वी व स्वेच्छेने वाटपित सदनिका रद्द केलेल्या ज्या अर्जदारांना अद्यापपर्यंत अनामत रकमेचा परतावा मिळालेला नाही, अशा अर्जदारांनी अर्ज करतेवेळी ज्या बँक खात्याद्वारे व ज्या पद्धतीने (क्रेडीट कार्ड / डेबीट कार्ड/नेट बँकिंग इ.) रकमेचा भरणा केला आहे, त्यांना त्याच बँक खात्यात  व त्याच पद्धतीने अनामत रकमेचा परतावा करण्यात येईल, असे सिडकोतर्फे कळविण्यात आले आहे.

========================================================

इतर बातम्यांचाही मागोवा