कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाच्या खर्चातील वाटा सिडको उचलणार

  • ४ कि.मी.चा मार्ग नवी मुंबईत 
  • २०२६ पर्यंत मेट्रो मार्ग पूर्ण करण्याचा मानस

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

नवी मुंबई , २० फेब्रुवारी २०१८:

एमएमआरडीएतर्फे उभारण्यात येत असलेल्या कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाच्या खर्चातील काही वाटा उचलण्यास  सिडको प्रशासनाने मान्य केले आहे. या मार्गाचा जो भाग नवी मुंबई व नैना क्षेत्रातून जातो त्यासाठीचा योग्य तो खर्च उचलण्याबाबत सिडको संचालक मंडळाच्या 18 फेब्रुवारी  रोजी पार पडलेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या मार्गाचा सुमारे 4 किमी भाग हा सिडकोच्या कार्यक्षेत्रातून जाणार आहे.

एमएमआरडीएतर्फे मेट्रो मार्ग क्र. 5 (ठाणे-भिवंडी-कल्याण) उभारण्यात येत असून त्याचा तळोजा, नवी मुंबई व पुढे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत  विस्तार करण्यात येणार आहे.सदर मेट्रो मार्गामुळे कडोंमपा, एमएमआर, सिडको, नैना, तळोजा एमआयडीसी यांसारख्या विविध क्षेत्रांचा विकास होण्यास चालना मिळणार असून अन्य गजबजलेल्या शहरांतील लोकसंख्येचा ओघ येथे वळण्यास मदत होणार आहे.

  • या प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाची मंजुरी मिळविण्याकरिता तसेच या मार्गाचा काही भाग हा सिडकोच्या कार्यक्षेत्रातून जात असल्याने एमएमआरडीएने दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) मार्फत डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) पाहणी करून नैना व सिडको क्षेत्रातून जाणाऱ्या या मार्गासाठी सिडकोतर्फे खर्चाचा योग्य तो वाटा उचलण्यात यावा, याबाबतची विनंती सिडकोला केली. सदर प्रकल्पाची अंमलबजावणी आर्थिकदृष्ट्या करणे शक्य व्हावे आणि त्यास सवलती व अनुदान मिळावे याकरिता सदर प्रकल्पाची अंमलबजावणी ही पूर्णत: शासकीय पुढाकारातून व्हावी अशी शिफारस करण्यात आली आहे. सदर मार्गाची एकूण लांबी 20.756 किमी असून त्यासाठी 5 हजार 865 कोटी इतका खर्च अंदाजित आहे.

 

  • कल्याण-तळोजा मेट्रो मार्गामुळे उपरोक्त भागांत लोकांचे स्थलांतर होऊन त्या अनुषंगाने त्यांचा विकास होणार आहे. कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाचा काही भाग हा सिडकोच्या नैना क्षेत्रातून जाणार आहे. प्रस्तावित नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. 1, 2, 3 व 4 यांसह सदर मार्गामुळे तळोजा एमआयडीसी क्षेत्र उर्वरित एमएमआर क्षेत्राशी जोडले जाणार आहे. नैना, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, तळोजा एमआयडीसी आणि एमएमआरमधील अन्य प्रदेशांना जोडण्यास महत्त्वाची भूमिका बजावणार हा मार्ग नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. सदर मेट्रो मार्ग सन 2026 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे, असे सिडको प्रशासनाने स्पष्ट केले आहे.  

=======================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा