12 फेब्रुवारीला नवी मुंबई महापौर चषक नृत्य व गायन स्पर्धेची अंतिम फेरी

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

नवी मुंबई, ११ फेब्रुवारी २०१९

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गायक व नृत्य कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरीता सातत्याने चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई महापौर चषक नृत्य व गायन स्पर्धेची अंतिम फेरी १२ फेर्बुवारीला सकाळी १०.३० पासून विष्णुदास भावे नाट्यवगृहात होणार आहे.

  • यावर्षी गायन स्पर्धेत 130 व नृत्य स्पर्धेत 141 कलावंत आणि समुहांनी सहभाग घेतला आहे. 8 फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून गायन स्पर्धेचे परीक्षक ऋग्वेद देशपांडे व नृत्य स्पर्धेच्या परीक्षक अंजली डावरे-बडवे यांनी प्रत्येक गटातून प्रत्येकी आठ कलावंत व समुहांची अंतिम फेरीसाठी निवड केली आहे.
  • अंतिम फेरीला सकाळच्या सत्रात गायन स्पर्धेची अंतिम फेरी व दुपारच्या सत्रात नृत्य स्पर्धेची अंतिम फेरी संपन्न होणार आहे. गायन व नृत्य स्पर्धेत वैयक्तिक तसेच समुह असे प्रत्येकी 8 कलावंत आणि समुह अंतिम फेरीसाठी पात्र ठरविण्यात आले आहेत.
  • अंतिम फेरीतील सादरीकरणानंतर या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सायं. 5 वा. विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते, इतर मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी स्पर्धेत सहभागी गायक, नृत्य कलावंतांचे कौतुक करण्यासाठी सिने अभिनेता पुष्कर जोग, सिने अभिनेत्री अश्विनी कासार तसेच संगीतकार अविनाश चंद्रचूड असे लोकप्रिय कलाकार उपस्थित राहणार आहेत.  

गायन स्पर्धेकरिता 15 वर्षाखालील छोट्या वैयक्तिक गटात प्रथम रू. 7 हजार, व्दितीय रू. 5 हजार, तृतीय रू. 4 हजार व चतुर्थ रू. 3 हजार अशी पारितोषिके तसेच समुहगान गटात प्रथम रू. 11 हजार, व्दितीय रू. 8 हजार, तृतीय रू. 6 हजार व चतुर्थ रू. 5 हजार अशी पारितोषिके सन्मानचिन्हासह प्रदान केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे 15 वर्षावरील मोठ्या वैयक्तिक गटात प्रथम रू. 10 हजार, व्दितीय रू. 7 हजार, तृतीय रू. 5 हजार व चतुर्थ रू. 4 हजार अशी पारितोषिके तसेच समुहगान गटात प्रथम रू. 15 हजार, व्दितीय रू. 10 हजार, तृतीय रू. 7 हजार व चतुर्थ रू. 5 हजार अशी पारितोषिके सन्मानचिन्हासह प्रदान केली जाणार आहेत. नृत्य स्पर्धेकरिताही अशीच पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

=================================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • छाया कला सर्कल ब्रास बॅंडची जादू