अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, २६ डिसेंबर २०१८:
मासेमारी करताना मच्छिमारांच्या जाळ्यात अशा दुर्मिळ आणि संरक्षित प्रजाती अडकल्यास मासेमारी जाळे फाडून किंवा कापून त्या प्रजातींना पुन्हा समुद्रात सोडण्यात येणार. असे करताना मच्छिमारांना मासेमारी जाळ्याच्या नुकसान भरपाईपोटी २५ हजार रुपये अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतला असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
- समुद्रात कासव, डॉल्फिन, शार्क आणि इतर दुर्मिळ प्रजाती आढळतात, ज्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत संरक्षित करण्यात आले आहे. मासेमारी करताना अनेकदा अशा प्रजाती मासेमाऱ्यांच्या जाळ्यांमध्ये अडकतात, त्यांना सोडवण्यासाठी मच्छिमार सुद्धा प्रयत्न करतात परंतु असे करताना मच्छिमाऱ्यांच्या जाळ्याचे नुकसान होते. त्यामुळे काही वेळेस मच्छिमार अशा प्रजाती पुन्हा समुद्रात सोडण्याचा प्रयत्न करत नाहीत. समुद्रातील दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण व्हावे, आणि त्यांची सुटका करताना मासेमारी जाळे फाटल्याने किंवा कापल्याने मच्छिमार बांधवांचे होणारे नुकसान ही टाळता यावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. मच्छिमारांना देण्यात येणारे अनुदान मुख्य वन संरक्षक, कांदळवन विभाग यांच्या कांदळवन कक्षामार्फत अटी आणि शर्तीच्या अधीन राहून देण्यात येईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
- नुकसानभरपाई अनुदान मागताना मच्छिमारांनी नौका मालकाचे नाव, पूर्ण पत्त्यासह अनुदानाचा अर्ज, नौकेचे नाव व क्रमांक, मासेमारी परवाना, नौका नोंदणी प्रमाणपत्र, नौकेवर उपस्थित सर्व सदस्यांची नावे आणि आवश्यक कागदपत्रे, ज्या ठिकाणी दुर्मिळ प्रजाती सापडल्या आहेत त्या ठिकाणचे जीपीएस क्रमांक, जाळी फाडताना व दुर्मिळ प्रजातींची सुटका करतानाचे छायाचित्र व चित्रफीत सादर करणे आवश्यक करण्यात आले आहे.
==============================================================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- हातमाग उद्योगाला नवसंजीवनी देणारा उपक्रम