नवी मुंबईत 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरण

  • 4 लक्ष 72 हजारपेक्षा जास्त मुलांचे लसीकरण

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, २२ नोव्हेंबर २०१८:

 संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 27 नोव्हेंबर पासून गोवर रुबेला लसीकरण मोहिम राबविली जात असून नवी मुंबई महानगरपालिकेने 27 नोव्हेंबर 2018 ते 8 जानेवारी 2019 या कालावधीत शाळा सत्रे, बाह्यसंपर्क सत्रे अशाप्रकारे अतिशय छोट्या पातळीवर जाऊन मोहिमेचे नियोजन केले आहे. साधारणत: 4 लक्ष 72 हजारपेक्षा जास्त मुलांना अतिशय सुयोग्य रितीने हे लसीकरण करण्याची आखणी करण्यात आली असून नवी मुंबईतील प्रत्येक पालकाने आपल्या 9 महिने ते 15 वर्षे वयाच्या मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असलेले गोवर रुबेला लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.

यावेळी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, अतिरिक्त आयुक्त (सेवा) महावीर पेंढारी, फ प्रभाग समितीच्या अध्यक्ष अनिता मानवतकर, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके, शिक्षणाधिकारी संदिप संगवे, वैद्यकिय अधिकारी व लसीकरण मोहिमेच्या क्षेत्रीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण, भारतीय बालरोगतज्ज्ञ असोसिएशनच्या नवी मुंबई अध्यक्ष डॉ. शिल्पा अरोसकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय येवले व डॉ. सुभाष राव आदी मान्यवर उपस्थित होते.

  • गोवर(मिझल्स) हा अत्यंत संक्रामक आणि घातक आजार असून तो मुख्यत्वे लहान मुलांना होतो. ताप येणे, शरीरावर पुरळ येणे, सर्दी व खोकला असणे, डोळे लाल दिसणे ही लक्षणे गोवरमध्ये आढळतात. लहान मुलांच्या मृत्यूसाठी गोवर हा आजार एक प्रमुख कारण आहे. सन 2016 च्या आकडेवारीनुसार गोवर आजारामुळे संपूर्ण जगात साधारणत: 1,34,200 मुले मृत्यूमुखी पडतात यापैकी 49,200 मुले (37%) संपूर्ण भारतात दरवर्षी मृत्यूमुखी पडतात.

 

  • रुबेला (जर्मन मिझल्स) हा आजार त्या मानाने सौम्य संक्रामक आजार आहे जो मुलांना तसेच प्रौढ व्यक्तींना देखील होतो, या रोगाच्या रुग्णांमध्ये गोवराप्रमाणेच लक्षणे दिसतात. रुबेला हा आजार गर्भवती मातेला झाल्यास बाळाचा उपजत मृत्यू होऊ शकतो, जन्माला येणाऱ्या बाळास मोतिबिंदू, हृदयाचे आजार, मतिमंदता, बहिरेपणा, वाढ खुंटणे, यकृत व प्लिहा या अवयवांचे आजार होऊ शकतात. याला जन्मत: रुबेला सिंड्रोम (Congenital Rubella Syndrome- CRS) असे म्हणतात. असे बालक त्या महिलेच्या कुटूंबासाठीच नव्हे तर समाजासाठी दुसरे ओझे लादल्यासारखे आहे. भारतामध्ये दरवर्षी अंदाजे 40 ते 50 हजार जन्मत: रुबेला सिंड्रोमचे (Congenital Rubella Syndrome- CRS) रुग्ण आढळतात.

==============================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • नवी मुंबईत लवकरच नर्सिंग कॉलेज -महापालिका आयुक्त डॉ.रामास्वामी एन.