महापालिका भाडेतत्वावर देणार सायकल
अविरत वाटचाल न्यूज
नवी मुंबई,31 ऑक्टोबर 2018 :
नवी मुंबई शहराला वाहतूककोंडी आणि प्रदूषण यांची समस्या भेडसावत आहे. त्यावर पर्याय म्हणून नवी मुंबई महापालिकेने जनसायकल सहभाग प्रणालीचा पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध केला आहे. गुरूवारी 1 नोव्हेंबर रोजी या जनसायकलचे उद्घाटन महापौर जयवंत सुतार यांच्याहस्ते होणार आहे. नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे हा पहिला सायकल ट्रॅक उभारण्यात आला आहे. उद्यापासूनच ही सेवा नवी मुंबईकरांसाठी उपलब्ध होणार आहे.
नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांनी शहरातील नागरिकांसाठी विविध उपयोगी असे प्रकल्प राबविण्यास सुरूवात केली आहे. जनसायकल हा त्याचाच एक भाग आहे. यामध्ये नागरिकांना सायकल भाडेतत्तावर उपलब्ध होणार आहे. यासाठी 20 /5 फुटाचे सायकल स्टॅंड उभारण्यात येणार आहेत. साधारण पाच ते दहा रूपये शुल्क यासाठी आकारले जाणार आहे. या सायकलला जीपीएस ट्रॅकर बसविण्यात आले आहेत त्यामुळे सायकल चोरी होण्याची शक्यता नाही.
“जन सायकल सहभाग प्रणाली” (Public Bicycle Sharing System) ही सध्या जागतिक स्तरावर वाहतुक व्यवस्थेच्या नियोजनात महत्वाची भूमिका बजावताना दिसत असून या माध्यमातून नागरिकांमध्ये सायकलिंगची आवड निर्माण करणे व त्यामधून शहराच्या पर्यावरण संवर्धनाला गती देणे हे उद्देश साध्य करण्यात येत आहेत. या प्रणालीव्दारे नवी मुंबई शहरात प्रदूषण विरहित वाहन अर्थात सायकलिंगला प्राधान्य देऊन प्रदूषणमुक्त, सुरक्षित, सोयिस्कर व परस्परांशी जोडणारी सहज सोपी वाहतुक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याकरीता पहिल्या टप्प्यात शहरात विविध महत्वाच्या 10 ठिकाणी आकर्षक सायकल स्टँड तयार करण्यात येत असून नागरिकांना सहजपणे ये-जा करण्यासाठी सायकल उपलब्ध असणार आहेत. या प्रणालीव्दारे पर्यावरणाशी बांधिलकी जपत नागरी जीवनशैलीत उद्भवणा-या आरोग्याच्या समस्यांवर मात केली जाणार आहे व सायकलींगचा सहज सोपा पर्याय नागरिकांसाठी खुला करून दिला जाणार आहे.
यावेळी ठाणे लोकसभा सदस्य खा. राजन विचारे, बेलापूर विधानसभा सदस्य आ. मंदा म्हात्रे, ऐरोली विधानसभा सदस्य आ. संदीप नाईक, विधानपरिषद सदस्य आ. रमेश पाटील, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, सभागृह नेते रविंद्र इथापे, विरोधी पक्ष नेते विजय चौगुले, परिवहन समिती सभापती रामचंद्र दळवी, कार्यक्रमाचे निमंत्रक अ प्रभाग समिती अध्यक्ष विशाल डोळस व स्थानिक नगरसेविका स्वप्ना गावडे, आणि इतर महापालिका पदाधिकारी, नगरसेवक – नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
======================================================================================================================================
- इतर बातम्यांचाही आढावा
सिडको इमारतींच्या पुनर्बांधणी बाबत महापालिका आयुक्त डॉ. रामस्वामी एन. यांची भूमिका