- 150 नागरिकांनी गाऱ्हाणी मांडली
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, 23 ऑक्टोबर 2018 :
कोपरखैरणे विभागात नागरिकांशी चर्चा करताना विशेषत्वाने रस्ते अरूंद असल्यामुळे भेडसावणारी पार्किंगची समस्या तसेच मुख्य चौकात होणारी वाहतूक कोंडी याविषयी त्याचप्रमाणे अनधिकृत फेरीवाल्यांविषयी बहुतांशी तक्रारी असल्याचे जाणवले. याबाबत ठोस उपाययोजना करून यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी कोपरखैरणे विभागाला भेट देऊन स्वच्छता तसेच नागरी सुविधा कामांची पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त शहर रविंद्र पाटील, शहर अभियंता मोहन डगांवकर, परिमंडळ 2 चे उप आयुक्त अमरिश पटनिगिरे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त तुषार पवार, उद्यान विभागाचे उप आयुक्त नितीन काळे, समाज विकास विभागाचे उप आयुक्त अमोल यादव, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनवणे, कोपरखैरणे विभागाचे सहा. आयुक्त अशोक मढवी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
- नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणारे विविध प्रकल्प कार्यान्वित होऊन नागरिकांच्या उपयोगी पडावेत तसेच प्रगतीपथावरील कामांना गती यावी यादृष्टीने महापालिका आयुक्त विभागनिहाय पाहणी दौरे करत आहेत. यामध्ये स्थानिक नागरिकांशी प्रत्यक्ष चर्चा केल्याने विभागातील अडीअडचणी, समस्या यांची माहिती मिळायला उपयोग होतो असे मत आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी व्यक्त केले. अनेक नगरसेवकांनीही यावेळी आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या या उपक्रमाची प्रशंसा केली तसेच प्रभागातील नागरी सुविधा कामाविषयी चर्चा केली.
- यावेळी 150 हून अधिक नागरिकांनी 42 टोकन क्रमांकाव्दारे वैयक्तिक तसेच सामुहिक रितीने आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेतली व आपल्या अ़डीअडचणी, सूचना, संकल्पना लेखी निवेदनांच्या स्वरुपात सादर केल्या. यामध्ये विशेषत्वाने पार्किंग, वाहतुक कोंडी, अनधिकृत फेरीवाले, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता, अतिक्रमणे, वैद्यकिय सुविधा, रस्ते, गटारे, पदपथ, दिवाबत्ती अशा विविध विषयांवर निवेदने सादर करण्यात आली.
- एम.आय.डी.सी. भागातील लघु उद्योजकांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्याठिकाणच्या मलनि:स्सारण वाहिन्यांमुळे होणा-या अडचणी दूर करण्याबाबत निवेदन केले. याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून एम.आय.डी.सी. प्राधिकरणाशी चर्चा करून हा प्रश्न टप्या-टप्याने मार्गी लावणेबाबत कार्यवाही करण्याचे आयुक्तांनी आश्वासित केले.
- कोपरखैरणे येथील माता बाल रुग्णालय नवीन बांधेपर्यंत नागरिकांना सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने त्या परिसरातील खाजगी रुग्णालयाच्या जागेत ते तात्पुरत्या स्वरुपात सुरु करणेबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल व त्या अनुषंगाने सर्वच रूग्णालये प्रभावीपणे कार्यरत होण्यासाठी नर्सेस व अनुषांगिक वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी यांची भरती करण्यात येत आहे असेही आयुक्तांनी सांगितले. अशाचप्रकारे कोपरखैरणे येथील अग्निशमन केंद्रही अधिकारी, कर्मचारी यांच्या लवकरच होणा-या भरतीनंतर लगेचच कार्यान्वित होईल असेही त्यांनी सांगितले.
- अनधिकृत फेरीवाल्यांच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने संपूर्ण आढावा घेण्यात येत असून रात्रपाळीतही फेरीवाला प्रतिबंधात्मक मोहिम राबविणेबाबत कार्यवाही करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. डी-मार्ट सर्कल येथील वाहतुक कोंडी टाळण्याच्या दृष्टीने त्याठिकाणी सिटी मोबॅलिटी प्लानच्या अंतर्गत वॉक – वे चे नियोजन असून यादृषअटीने आणखी उपाययोजना करण्याकडे विशेष लक्ष दिले जाईल असे त्यांनी सांगितले.
- काही उद्योग समूह बहुतांशी रात्री अथवा सुट्टीच्या दिवशी नाल्यांमध्ये रसायने सोडतात अशा तक्रारी प्राप्त झाल्या असून नागरिकांना प्रदूषणाचा त्रास होऊ नये यादृष्टीने यापूर्वी पाच उद्योगांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली होती. यापुढील काळात त्यांच्या समन्वयाने यामधून मार्ग काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
- नागरिकांशी सुसंवादानंतर प्रत्यक्ष विभाग भेटीमध्ये नागरिकांकडून प्राप्त झालेल्या मोठ्या प्रमाणावरील पार्किंग समस्या व त्यामुळे होणा-या वाहतुक कोंडीच्या तक्रारींच्या अनुषंगाने आयुक्तांनी डी-मार्ट ला भेट दिली असता त्याठिकाणी त्यांच्या पार्किंगच्या जागेत दुकानातील माल ठेवल्याचे निदर्शनास आले तसेच जिन्यावरही विक्रीकरीता साहित्य ठेवलेले लक्षात आले. त्यामुळे एखादी दुर्घटना घडली तर सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांना बाहेर पडण्यास पुरेशी जागा नाही ही स्थिती लक्षात घेऊन आयुक्तांनी संबंधित डी – मार्ट व्यवस्थापनास त्यांच्या पार्किंगच्या जागेचा वापर त्यांनी पार्किंगसाठी न केल्याने रस्त्यावरील पार्किंगची व वाहतुक कोंडीची समस्या वाढत असल्याबाबत जाब विचारला आणि पार्किंगच्या जागेत ठेवलेला माल महानगरपालिकेमार्फत जप्त करून पार्किंगची जागा पार्किंगसाठीच वापरण्याचे निर्देश दिले.
- आयुक्तांनी सेक्टर 5 येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या बहुउद्देशीय इमारतीस भेट देऊन तेथील बांधकामाची पाहणी केली. त्याचप्रमाणे सेक्टर 10 येथील महिला सक्षमीकरण केंद्र इमारतीस भेट देऊन ते लवकरात लवकर उपयोगात आणण्याचे निर्देश संबंधितांना दिले. सेक्टर 15 येथील रस्ता, फुटपाथ, फेरीवाले या सगळ्याच बाबींची पाहणी करून त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. निसर्गोद्यान येथे प्रगतीपथावर असलेल्या स्वच्छता विषयक जनजागृतीचे रोल मॉडेल होईल अशा स्वच्छता पार्कच्या कामांचीही त्यांनी पाहणी केली.
- बोनकोडे येथील कॉर्नर गार्डन, अंगणवाडी, मार्केट या सुविधांनाही भेट देऊन त्यांनी मौलीक सूचना केल्या. शिवण क्लासला भेट देऊन त्याठिकाणी योजना व्यवस्थित राबविली जात असल्याबाबत पाहणी केली व त्या वास्तूची डागडूजी आणि रंगरंगोटी करून सुधारणा करण्याचे आदेश दिले. नागरी आरोग्य केंद्र इमारतीस भेट देऊन तेथील कार्यपध्दतीची त्यांनी पाहणी केली व इमारत सुधारणा करण्याकडे लक्ष देण्याचे निर्देश अभियांत्रिकी विभागास दिले.
२४ ऑक्टोबर रोजी आयुक्त वाशीत
विभागातील पाहणी दौ-यात आयुक्तांना नागरिकांशी सुसंवाद साधल्याने कामांची आवश्यकता लक्षात येते तसेच प्रत्यक्ष पाहणीव्दारे सुविधा कामांची गुणवत्ता पाहता येते. याच अनुषंगाने मंगळवार, 24 ऑक्टोबर 2018 रोजी वाशी विभागातील पाहणी दौरा होणार असून विष्णुदास भावे नाट्यगृह कार्यालय याठिकाणी सकाळी 10 ते 11 या वेळेत आयुक्त नागरिकांशी सुसंवाद साधणार आहेत. तरी जे नागरिक आपल्या अडी-अडचणी, समस्या, सूचना आयुक्तांकडे सादर करू इच्छितात त्यांनी आपले निवेदन दोन प्रतीत आणून सकाळी 9.30 ते 10 या वेळात आपला टोकन क्रमांक प्राप्त करून आयुक्तांची भेट घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
==========================================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- नवी मुंबईतील विविध प्रश्नांवर महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्याशी वन टू वन चर्चा
- अविरत वाटचालचे इतर व्हिडिओ जरुर बघा -avirat vaatchal news यु ट्युब चॅनल वर