मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
अविरत वाटचाल न्यूज
मुंबई, 11 ऑक्टोबर 2018 :
लठ्ठपणा (ओबेसिटी) या आजाराबाबत पुरेशी माहिती नाही. त्यामुळे लठ्ठपणाबद्दल वैज्ञानिक महत्व पटवून दिल्यास लोकांना त्वरित याबाबतची गंभीरता समजेल. विशेषत: चाईल्ड ओबेसिटीवर शासन पातळीवर त्वरित कार्यवाही करण्यात येईल यासाठी जेटी फाऊंडेशन या संस्थेबरोबर टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे. शिवाय मेटाबॉलिक इन्स्टिट्यूट सुरु करण्यासाठी शासन पुढाकार घेणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राजभवन येथे विश्वकर्मा पब्लिकेशन प्रकाशित व लेखिका डॉ.जयश्री तोडकर व पत्रकार संतोष शेनॉय लिखित ‘ओबीसिटी मंत्र’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते करणयात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपालांचे सचिव वेणूगोपाल रेड्डी, वाहतूक विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोर्ट ट्रस्टचे उपाध्यक्ष यशोधन वणगे, अन्न व औषध प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे, ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात, प्रशांत पवार, हिरानंदानी हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चटर्जी, मॉरिस फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उमा कुलकर्णी, पुण्याचे माजी उपमहापौर डॉ. शंकरराव तोडकर, जेटी फाऊंडेशनचे सचिव डॉ. हेमंत तोडकर आदी उपस्थित होते.
खाण्याच्या पद्धती, जीवन पद्धती, व्यायाम कसा असावा, आहार कोणता टाळावा, याची माहिती या पुस्तकातून मिळते. लठ्ठपणाशी झगडणाऱ्या कुटुंबाला हे पुस्तक मैलाचा दगड ठरणार आहे. मोठ मोठ्या हॉटेलमध्ये आता मेनूकार्डवर कॅलरी यायला हव्यात. त्यातून काय खावे हे समजेल. जंक फूडबाबतही समाजात जागृती होण्यासाठी शासनस्तरावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिले.
लठ्ठपणामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. काहीवेळा लठ्ठ माणूस चेष्टेचा विषय ठरतो, त्याला त्याचा कमीपणा वाटतो. शहरी भागात मधूमेह, हृदयविकार, रक्तदाब हे आजार वाढत आहेत. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. लठ्ठपणा हे आरोग्य क्षेत्रापुढील गंभीर आव्हान असल्याचे मत राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी व्यक्त केले.
राज्यपाल राव म्हणाले, आपला देश हा 29 वर्षांखालील तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. लठ्ठपणा आणि बदलती जीवनशैली यांच्याशी संबंधित विकारामुळे युवा वर्गाचे फार मोठं नुकसान होईल. त्यांच्यात जागृती आणायला हवी. जागतिक आकडेवारीनुसार 39 टक्के प्रौढ व्यक्ती अतिरिक्त वजनाच्या असून यातील 13 टक्के लोक लठ्ठपणाशी झुंज देत आहेत. यामुळे सक्तीने प्रत्येक शाळांमध्ये शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला वैद्यकीय शिबीर आयोजित करून मुलांमध्ये लठ्ठपणा व योग्य आहार याबाबत जागृती करावी. यासोबत मोफत दंत चिकित्सा शिबीराचे आयोजनही करावे, अशी सूचनाही राज्यपाल यांनी केली.