हनुमाननगर, तुर्भे येथील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका

  • नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.रामास्वामी एन.  यांचे आवान

अविरत वाटचाल न्यूज 

नवी मुंबई, 29 सप्टेंबर 2018:

नवी मुंबई महापालिका हद्दीतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अपुऱ्या पडणाऱ्या क्षेपणभूमीच्या विकासाच्या पुढील टप्प्यासाठी  तुर्भे परिसरातील जागा शासनाने महापालिकेला देवू केली आहे. मात्र जागेचे अधिग्रहण करताना या जागेवरील संरक्षित केलेल्या निवास झोपड्या वगळूनच शासनाकडून जागा महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे. परंतु जमीन हस्तांतरणाच्या प्रक्रियेबद्दल काही लोकांकडून चुकीची माहिती नागरिकांसमोर मांडली जात आहे. त्यामुळे हनुमाननगर, तुर्भे येथील नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले आहे.

  • नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याची विल्हेवाट नागरी घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम – 2000 प्रमाणे करण्याकरीता तुर्भे येथे 103 एकर जागेची मागणी महानगरपालिकेकडून महाराष्ट्र शासनाकडे करण्यात आली होती. त्यास अनुसरुन नवी मुंबई महानगरपालिकेस 65.08 एकर जागा 1 जुलै 2004 रोजी शासनाने उपलब्ध करुन दिली असून सदरची जागा महानगरपालिका क्षेत्रातील घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरीता अपूरी पडत असल्यामुळे क्षेपणभूमीच्या विकासाच्या पुढील टप्प्यांकरीता उर्वरित 34 एकर जागेची शासनाकडे मागणी करण्यात आलेली होती. याविषयी महापालिका आयुक्त् डॉ. रामास्वामी एन. यांचेमार्फत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. 

त्या अनुषंगाने शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मौजे – तुर्भे, ता.जि.ठाणे येथील गट नं.376 मधील 18 एकर क्षेत्र, गट नं.377 मधील 3.75 एकर क्षेत्र, व गट नं. 378 मधील 12.25 एकर क्षेत्र अशी एकूण 34 एकर जागा महानगरपालिकेस देऊ करण्यात आलेली आहे. सदर जागेचे अधिग्रहण करण्यापूर्वी शासनाने अतिक्रमण विरहीत व झोपडपट्टी निवासी क्षेत्र वगळून महानगरपालिकेला जागा उपलब्ध करुन दयावी अशी विनंती शासनास करण्यात आलेली आहे. या जागेवरील संरक्षित केलेल्या निवासी झोपडया वगळूनच शासनाकडून महानगरपालिकेकडे जागा हस्तांतरीत करुन घेण्यात येणार आहे.

 

याबाबत तेथील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येत असून, काही नागरिकांकडून चुकीची व खोटी माहिती प्रसारित केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. तरी हनुमाननगर, तुर्भे येथील नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले आहे.

========================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • वाहतुकीला अडथळा ठरणारे सीबीडी सर्कल हटवणार