सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीत वीजदर

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 12 सप्टेंबर 2018 :

सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना वीजपुरवठ्यासाठी महावितरणने सवलतीच्या वीजदरासह एकच स्लॅब ठेवल्याने या मंडळांनी वापरलेल्या शेवटच्या युनिटलाही वहन आकारासह केवळ 4 रुपये 38 पैसे प्रतियुनिट दर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशमंडळांनी महावितरणकडून अधिकृत वीजजोडणी घ्यावी असे आवाहन महावितरणने केले आहे.

राज्यात 13 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. गणेश मंडळांना तात्पुरती वीजजोडणी देण्यासाठी पुरेसे वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उपलब्ध असलेले हे मीटर प्राधान्याने गणेश मंडळांच्या वीजजोडणीसाठी वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट 3 रुपये 20 पैसे अस्थिर आकार आणि 1 रुपया 18 पैसे वहन (व्हिलींग) आकार असा एकूण 4 रुपये 38 पैसे प्रतियुनिट सध्याचा दर आहे. याउलट घरगुती व वाणिज्यिक किंवा इतर वर्गवारीमध्ये वीजवापराच्या स्लॅबनुसार वेगवेगळे वीजदर निश्चित करण्यात आले आहे. मात्र सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांसाठी घेतलेल्या वीजजोडणीद्वारे वीजवापरासाठी केवळ एकच वीजदर आकारण्यात येत आहे. त्यामुळे कितीही वीज वापरल्यास शेवटच्या युनिटपर्यंत केवळ 4 रुपये 38 पैसे दर आकारण्यात येणार आहे. या तुलनेत घरगुती व वाणिज्यिक वर्गवारीचा वीजदर स्लॅबनुसार दुप्पट व तिपटीने अधिक आहेत.

  • सार्वजनिक गणेशोत्सवात हजारोंच्या संख्येत भाविकमंडळी श्रीगणेशांच्या दर्शनाला आणि विविध ठिकाणी देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी पावसामुळे वीजसुरक्षेबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी गणेश मंडपातील वीजयंत्रणेची वायरमनकडून दैनंदिन तपासणी करण्यात यावी. तातडीच्या मदतीसाठी गरज भासल्यास 24 तास सुरु असणार्या टोल फ्री क्रमांक 1912, 18001023435 किंवा 18002333435 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

============================================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • स्पंदना -महिला लघुउद्योजकांच्या उत्पादनांसाठी व्यासपीठ