झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ‘आसरा’ ॲप

  • सामान्य झोपडीधारकांना झोपडी क्रमांकाचीही माहिती मिळणार

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई,11 सप्टेंबर 2018:

बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची सविस्तर माहिती असणारे ‘आसरा’ या मोबाईल ॲप्ल‍ीकेशनचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने हे ॲप तयार केले आहे. या मोबाईल ॲप्ल‍ीकेशनचा उपयोग झोपडपट्टीधारकांना होऊन या प्राधिकरणाच्या संपूर्ण कामकाजात पारदर्शकता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने डिजिटलायझेशनची चांगली सुरुवात केली आहे. झोपडपट्टीवासियांना विविध सोयी सुविधा, योजना यांची माहिती होण्याच्या दृष्टीने या ‘आसरा’ ॲपचा उपयोग नक्कीच होईल. या विभागाने त्यांच्या संपूर्ण कामकाज आणि व्यवहाराचे डिजिटलायझेशन करावे अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

 

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनी या ‘आसरा’ ॲपचे सादरीकरण करुन माहिती दिली. ‘आसरा’ हे ॲप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध असून बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची सविस्तर माहिती त्यात असणार आहे. जीपीएसच्या मदतीने ‘आसरा’ ॲपद्वारे वैयक्तीक झोपडीची माहिती, प्रस्तावित योजना व झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषीत असलेल्या योजनांची माहिती या ॲपद्वारे मिळू शकते. तसेच सामान्य झोपडीधारक हे आपली झोपडी व झोपडपट्टीसंबंधित झोपडी क्रमांक, गाव, प्रभाग, तालुका, जिल्हा, स्लम क्लस्टर 2016 आदी माहिती घेऊ शकतात.

  • यावेळी गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

==========================================================================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा 

  • तंबाखू सेवनामुळे होणारे दुष्परिणाम