अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, 3 सप्टेंबर 2018:
आपल्या देशात जलसंधारणाची कामे झाली आहेत, परंतू आता जलसाक्षरतेची गरज आहे. त्यासाठी आंतरसंवादाची आवश्यकता आहे. संवादातून शाश्वत विकास होतो. असे प्रतिपादन जलबिरादरी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र सिंह यांनी केले.
जलसाक्षरता केंद्र यशदा व कोकण विभागाद्वारे 3 सप्टेंबर रोजी कोकण विभागीय जलसाक्षरता कार्यशाळेचे सिडको भवनमध्ये आजोयन करण्यात आले होत. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, विभागीय महसूल आयुक्त कोकण विभाग डॉ.जगदीश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी संचालक भारतीय औद्योगिक महासंघ त्रिवेणी पाणी संस्था डॉ.कपिल नरुला, मुंबई विद्यापीठाच्या सिंधू स्वाध्याय संस्थेचे समन्वयक विनायक दळवी, संचालक जलसाक्षरता केंद्र यशदा आनंद पुसावळे, उपमहासंचालक यशदा प्रेरणा देशभ्रतार, जलनायक डॉ.श्रीनिवास वडगबाळकर आदि उपस्थित होते.
- यावेळी सिंह म्हणाले, पाणी सद्याच्या काळात आर्थिक विकासाचे महत्वाचे साधन झाले आहे. आज पाण्याच्या टंचाईमुळे काही देशात लोकांचे स्थलांतरण सुरु झाले आहे. जलसाक्षरतेचे महत्व गावपातळीपर्यंत पोहोचविल्यास पाण्याचे योग्य नियोजन करणे शक्य आहे. लोकसहभाग व प्रशासन यांच्या सहभागाने जलसाक्षरता हा शासनाचा उपक्रम आहे. यामध्ये मुंबई विद्यापीठानेही सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणाची भौगोलिकता वेगळी आहे. त्यामुळे गावनिहाय नियोजन करणे आवश्यक आहे. स्थानिक लोकांच्या ज्ञानाचा उपयोग या कामासाठी करणे गरजेचे आहे. कारण त्या लोकांना गावातील समस्या माहिती असतात. सद्याच्या काळात हवामानावर आधारित पिक नियोजन करणे आवश्यक आहे. यामध्ये स्वंयसेवी संस्थांनीही काम करताना प्रशासनाशी संवाद साधला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
- कोकण विभागीय आयुक्त डॉ.जगदीश पाटील म्हणाले की, जलसाक्षरता जलजागृतीचा उपक्रम लोकसहभागातून व स्वयस्फूर्तीने पुढे येणा-या स्वंयसेवकाद्वारे राबविण्याचे शासनाचे धोरण आहे. राज्यात जलसाक्षरतेबाबत यंत्रणा उभी केली त्यात राजेंद्र सिंह यांचे मोठे योगदान आहे. लोकसहभाग वाढवायचा असेल तर स्थानिक लोकांचा अनुभव व तंत्रज्ञानाची जोड देऊन काम करावे लागेल. राज्यात भौगोलिक असमतोल असल्यामुळे प्रत्येक ठिकाणाच्या अडचणी वेगवेगळया आहेत. त्यामुळे प्रत्येक गावाचे तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार नियोजन करावे. यामध्ये स्वंयसेवी संस्था, जलसेवक, जलनायक, जलकर्मी यांचाही सहभाग महत्वाचा आहे.
यावेळी जलसाक्षरता आणि जलक्षेत्रातील अनुभव याबाबत सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये छोट्या ओहोळावरील साखळी बंधारे-सरवले दहिवडी सावर्डे शेखर निकम, कोकणातील माथ्यावरील कामे तालुका महाड अनुभव कथन जलनायक किशोर धारिया, लोकसहभागातून गोडया पाण्याच्या तलावाची दुरुस्ती श्रीकृष्ण तलाव बोईसर दिलीप सावे आणि अनंत कित्तूर, कोकणातील जलनियोजन गाव घटक मानून कसा करावे जलनायक डॉ.अजित गोखले, कोकणातील युवकांचे पाण्यासाठी योगदान कसे घेता येईल जलनायक संजय यादवराव, कांदळवने/खारभूमी सद्यस्थिती अधिक्षक अभियंता कोकण खोरे विकास महामंडळ अे.अे.आव्हाड, अतिपावसाच्या प्रदेशातील जलसंधारण विशेष संदर्भ सिमेंट नाला बांध आणि इतर रचना जिल्हाधिकारी पालघर प्रशांत नारनवरे, भारतीय औद्योगिक महासंघ यांचे माध्यमातून जलक्षेत्रात केलेली कामे विशेष संदर्भ कोकण मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी संचालक भारतीय औद्योगिक महासंघ त्रिवेणी पाणी संस्था डॉ.कपिल नरुला, जलसाक्षरतेत मुंबई विद्यापीठाचा सहभाग मुंबई विद्यापीठाच्या सिंधू स्वाध्याय संस्थेचे समन्वयक विनायक दळवी यांनी केले. यावेळी ठाणे व पालघर जिल्हयाच्या कॉफीटेबल बुकचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यशाळेस कोकण विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य अभियंता जलसंपदा, विभागीय कृषि सहसंचालक, उपजिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता जलनसंपदा विभाग, तहसिलदार, गट विकास अधिकारी, अधीक्षक कृषि अधिकारी, जलसंधारण क्षेत्रात कार्य करणारे स्वयंसेवक आदि उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रास्ताविक उपमहासंचालक यशदा प्रेरणा देशभ्रतार यांनी केले. तर सुत्रसंचालन तरुलता धानके यांनी केले.
==============================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- नेरुळ-खारकोपर रेल्वेमार्ग ऑक्टोबरला सुरु- सिडको एमडी